पंकजाताई मुंडेंचे स्वतःसह राजेंद्र मस्केंना विजयी करण्याचे आवाहन!

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र

बीड दि.30 ः बीडचा आमदार हा भाजपाचा (beed mla bjp) असला पाहिजे, त्याच बरोबर जिल्ह्यातील इतरही भाजपा उमेदवार विजयी करायचे आहेत. त्यासाठी सर्वांनी पंकजाताईंच्या पाठीमागे उभे रहावे, त्या जिल्ह्याचे चित्र बदल्याशिवाय राहणार नाहीत, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावणकुळे यांनी केले. त्यानंतर बोलताना पंकजा मुंडे (pankaja munde) म्हणाल्या की, पक्ष काय भूमिका घेणार मला माहित नाही पण मी माझी भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेशी पक्षाला सहमत करण्याचा प्रयत्न करेल. पण आता मला आणि राजेंद्र मस्के यांनाही विजय करा असे आवाहन करत पंकजा मुंडे यांनी स्वतःसह राजेंद्र मस्केंची उमेदवारीच जाहीर केली आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त राजेंद्र मस्के मित्रमंडळाच्यावतीने बीडमध्ये शुक्रवारी (दि.30) बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री पंकजा मुुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खा.प्रीतम मुंडे, आ.लक्ष्मण पवार, रमेश आडसकर, मोहन जगताप, अ‍ॅड.सर्जेराव तांदळे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला काही मिळालं नाही की कार्यकर्त्यांना घोर निराशा येते. पण आता ते सोडा. मागच्या काळात आपल्याला खूप अनुभव आले. विधानसभेला दुधही पोळले. त्यामुळे आता ताकही फुंकून प्यायचे आहे. बीड जिल्ह्यात मी पालकमंत्री असताना भरपूर निधी दिला, मात्र आता कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. आता मी माझी भूमिका ठरवली आहे. पक्षाची भूमिका काय आहे माहिती नाही पण मी भूमिका घेतली आहे. आगामी निवडणुकीत मला आणि राजेंद्र मस्के यांनाही निवडून द्या, असे आवाहनच पंकजा मुंडे यांनी केल्याने आता बीड विधानसभा मतदार संघातून पंकजा मुंडेंनी राजेंद्र मस्के यांची उमेदवारीच जाहिर केल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच बीड जिल्हा महाराष्ट्राचे राजकारण करतोय, त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतू कुणीही त्याला काढू शकणार नाही. माझ्या संघर्षामध्ये कोण-कोण सहभगी होणार असे विचारत ‘अमर रहे.. अमर रहे.. मुंडे साहेब अमर रहे’ अशी घोषणा त्यांनी दिली.

Tagged