माजलगाव : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केले होते. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर सोमवारी (दि.30) संतप्त मराठा आंदोलकांनी आ. सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करत वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर गाड्याही पेटविण्यात आल्या.
![](https://i0.wp.com/karyarambhlive.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231030-WA0020.jpg?resize=640%2C292&ssl=1)
दोन – चार दिवसांपूर्वी एका मराठा तरुणाने आमदार प्रकाश सोळंके यांना भ्रमणध्वनीद्वारे कॉल करून मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली, तसेच मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेट संपला तरी सरकार निर्णय घेत नाही, आपण भूमिका जाहीर करावी अशी मागणी केली. त्यावर आ.सोळंके यांनी जरांगे यांनी ग्रामपंचायतची निवडणूक तरी लढवलेली आहे का? असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर मराठा बांधवांनी संतप्त भावना व्यक्त करत जिल्हाभरात ठिकठिकाणी निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. दरम्यान आज सकाळी माजलगावात आ.प्रकाश सोळंके यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी काही आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
![](https://i0.wp.com/karyarambhlive.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231030-WA0021.jpg?resize=264%2C264&ssl=1)