आ.प्रकाश सोळंके बंगल्यात; ऑफिससह वाहने पेटवली!

बीड


माजलगाव दि. 30 : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हे बंगल्यात असून संतप्त जमावाने बंगल्यासमोरील चार आलिशान कार, 10 दुचाकीसह ऑफिस पेटवले आहे. दरम्यान ऑफिसमधील कॉम्पुटरसह इतर साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे.

दोन-चार दिवसांपूर्वी एका मराठा तरुणाने आमदार प्रकाश सोळंके यांना भ्रमणध्वनीद्वारे कॉल करून मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली, तसेच मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेट संपला तरी सरकार निर्णय घेत नाही, त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यामुळे आपण भूमिका जाहीर करावी अशी मागणी केली. त्यावर आ.सोळंके यांनी जरांगे यांनी ग्रामपंचायतची निवडणूक तरी कधी लढवलेली आहे का? असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर मराठा बांधवांनी संतप्त भावना व्यक्त करत जिल्हाभरात ठिकठिकाणी निषेधार्थ आंदोलन केले. दरम्यान आज सोमवारी सकाळी माजलगावात आ.प्रकाश सोळंके यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी काही आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक केली. बंगल्यासमोर असलेल्या ऑफिसला आग लावत पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी, कार पेटवल्या आहेत. यामुळे माजलगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तसेच बंगल्याच्या बाहेर हजारोंच्या संख्येने जमाव आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्हा पोलिस दलाचा मोठा फौजफाटा माजलगावकडे रवाना झाला आहे.