घाटनांदूर : अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शत्रूघन अनुरथ काशीद यांचा मृतदेह आणण्यात आला असून इथेच आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय शत्रुघ्न काशीद यांचा अंत्यविधी करणार नसल्याची आक्रमक भूमिका काशीद यांचे कुटुंबीय आणि येथील मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे.
शुक्रवारी (दि.27 ) रात्री उशिरा अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील तरुण शत्रुघ्न अनुरथ काशीद यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करत पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने तालुक्यातील मराठा समाज शासन आणि प्रशासनाच्या विरोधात अत्यंत आक्रमक झाला असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काशीद यांच्या प्रेतासह हजारोंच्या संख्येने मराठा समाजाने ठिय्या मांडला आहे.