mushakraj

मुषकराज भाग 7 : ‘बदका’चं डुबूक डुबूक

राजकारण संपादकीय

बालाजी मारगुडे, बीड मो. 9404350898

(लॉकडाउन उठल्याने नुकतीच अंतर जिल्हा बससेवा सुरु झाली होती. त्यामुळे पुढचा प्रवास बसने करण्याचा निर्णय बाप्पांनी घेतला होता. उदगीर-माजलगाव बसमध्ये दोघेही बसले. एकदम चकाचक बस पाहून बाप्पांनाही आत्मिक आनंद झाला होता. एखाद्या विमानात बसल्यानंतर हवाई सुंदरीनं जेवढ्या आदबीनं आपलं स्वागत करावं त्याच्या कैकपट नम्रता कंडक्टरमध्ये आलेली दिसत होती. प्रसन्न मुद्रेनं त्यांनी बाप्पांना आधी वंदन केलं. आणि तिकिट काढण्याबाबत मुषकाला विचारले.)
मुषक ः कसलं तिकिट? अरे हे साक्षात श्री गजानन, गणपती, वक्रतुंड, विघ्नहर्ता… किती म्हणून नावं सांगू? कुठल्याही गोष्टीचा ‘कार्यारंभ’ करण्यापुर्वी लोक यांचं नमन करतात. अन् तुम्ही चक्क आम्हाला तिकिट मागताय?
कंडक्टर ः त्याचं काय आहे मुषकराज… आधीच चार महिने बंद असल्यामुळे एकतर ही तोट्यात गेली. आता चालू केली तर 60 वर्षाची माणसं बाहेरच पडत नाहीत. हीला एकमेव त्यांचाच आधार… एवढ्या माऊलींच्या पालख्या निघाल्या त्यांनी सुध्दा भाडं भरलं राव… त्यांना जो नियम तोच तुम्हाला पण…
मुषक ः ठिकंय बाबाऽऽ अशीच प्रामाणिक ड्यूटी कर… तुला काहीएक कमी पडणार नाही. तुझ्यासारखीच सदबुध्दी आमचा बाप्पा बाकीच्या शासकीय कर्मचार्‍यांना पण देवोऽऽ
(बस चाटगाव, तेलगाव, करीत करीत माजलगाच्या जुन्या बसस्थानकावर येऊन पोहोचते. दोघेही इथे उतरतात)
बाप्पा ः बस माजलगावकडं वळल्यावर रथपाळण्यात बसल्यासारखंच झालं. दोन तीनदाऽ ती जरा अशी एकदम खाली अन् एकदम वर गेल्यासारखी वाटली…
मुषक ः या रस्त्यावर वर्दळ जास्तंय… सॅन्डची वाहतूक सर्रास होते. अन् त्यातल्या त्यात तुमच्यासारखी अंगकाठी असलेले इथले ‘ईका’स पुरुष सारखे माजलगाव-तेलगाव-चाटगावला चकरा मारत असतेत… त्यामुळे दोन-चार ठिकाणी रस्ता दबलाय एवढंच… बाकी काही नाही. आता हवेतून खाली आला असाल तर सांगा कुणीकडं जायचं?
बाप्पा ः हो हो तरऽऽ मला आता नगर पालिकेत घेऊन चल…
(मुषक आणि बाप्पा नगर पालिकेत दाखल होतात…)
बाप्पा ः अरे इथं तर कुणीच कसं दिसना?
मुषक ः हल्ली इकडं कुणीच नाही येत…
बाप्पा ः (आश्चर्यचकितपणे) कायऽऽ? काही झालं का?
मुषक ः काय होणार होतं इथं? पहिल्याला जेलमध्ये टाकायचं, दुसर्‍याला बसवायचं, त्याच्या सह्या घ्यायच्या अन् इथलं कपाट उचलून बांधकाम विभागात मांडायचं… मग इथं रिकाम्या कपाटाला कोण उदबत्त्या ओवाळीत बसणार?
बाप्पा ः अस्संय काऽऽ? चल आलं लक्षात…
मुषक ः आता कुठे चालायचं..?
बाप्पा ः मला जरा जुन्या मोंढ्यात घेऊन चल…
मुषक ः बाप्पा आता माझी पाठ मोडून जाईल. इथले रस्ते एकदम तोंडालाच डोंगरावर चढल्यासारखे अन् उतरल्यासारखे आहेत बघा…
(मुषकाची निघणारी बेजारी पाहून बाप्पा खाली उतरतात अन् दोघंही जुन्या मोंढ्यात गणपती मंदिराजवळील ग्राहक भांडार जवळ येऊन थांबतात.)
बाप्पा ः आधी या भांडारमध्ये चल, आपण काही किराणा खरेदी करू…
मुषक ः (पोटधरून हसून) तुम्ही येडेबिडे झाले का काय? इथल्या दुकानाचा मागच सगळ्यांनी ‘भंडारा’ वाटून खाल्ला… त्यामुळं इथं तसंल काहीच मिळणार नाय… तुम्ही आता उगा थकला असाल तर खिशात हात घाला, पाचचा ठोकळा काढा अन् पाठीमागून जा, तिथं त्या मशीनमधी ठोकळा टाका अन् एखादी पाण्याची बाटली भरून घ्या… त्ये झाल्यावर तसंच मागून बँकेत घुसाऽऽ आपल्याला काही खर्चापाण्याला पैसे काढा, तिथूनच मागच्या दारानं ग्राहक भांडारमधी घुसलात तरी बी चालंल. पुढं आल्यावर एखादी आंब्याची पेटी घ्यावा. तिथं मार्केट रेटपेक्षा 100-200 जास्त द्या… कसंय ते विकासनिधी असतोय. अन् ते झाल्यावर तिथूनच एक ठिबकची नळी घ्या… बाहेर बसून आपण दोघंबी ठिबकच्या नळीतून आंब्याचा रस पिऊ…
बाप्पा ः (एकदम रागात जोरात ओरडतात..) मुषकाऽऽऽ हे काय बोलतोस तू..?
मुषक ः बाप्पा माझं काय चुकलं नाय बगा… मी जे पाहतोय ते तुम्हाला सांगतोय…. ही आजची जन‘जागृती’ म्हणा किंवा खबरबात म्हणा… तुम्हाला जे वाटतंय ते समजा…
बाप्पा ः अरे मी तुला माजलगावचं काय कुशल ‘मंगल’ चाललंय ते विचारतोय… तू सगळंच अमंगल बोलतोय…
मुषक ः आता जे आहे तेच बोलतोयऽऽऽ, उगी तुम्ही आलाय म्हणून सगळं डाली खाली झाकून ठेवायला मी काय त्या शहर ठाण्यातल्या ‘बुध्दीवंत’ माणसासारखा थोडाचंय? साहेबांना ‘हर्ष’ व्हावा म्हणून आपल्याच ‘सॅन्ड’च्या दोन दोन हायवा झाकून ठेवायला? अन् तुम्हीबी थोडे डोळे उघडे ठेवत चला… तुम्ही असे डोळे झाकून घेतले की बाजार समितीत सुध्दा ‘बदकांचा’ सुळसुळाट सुरू झालाय. आता इथला ‘बदक’ मुंबईच्या बाजार समितीत ‘डुबूक डुबूक’ करणारंय म्हणे?
बाप्पा ः मुषकाऽऽ बास्स् कर… तुझ्या जिभेला काही हाडबीड? उचलली जीभ लावली टाळाला?
मुषक ः (एकदम गुलाबी हिंदीत बोलायला लागतो) बाप्पा यह तो फक्त ‘10 टक्के’च बोल्या है… औरभी पुरी स्टोरी बाकी हाय… ‘टक्केवारी’का भलामोठा कागद तुमको मै देता… त्यातल्या येगयेगळ्या डिपार्टमेंटची लीस्ट जर तुमको देखणे का हैऽऽ तो मैने ओ संभालके रखी है… बताऊँ क्या बताऊँ…? बोलो बोले..?
बाप्पा ः बस्स्ऽ बस्स्ऽऽ बस्सऽऽऽ आता काहीएक सांगू नकोऽऽ ती यादी तुझ्याकडेच ठेव… माजलगावच्या ‘प्रकाश’नगरीची अशी ‘अंधार’नगरी झालेली पाहून आता मला अतिव दुःख होतंय. मला तू तातडीनं इथल्या मतदाराच्या प्रमुखांकडं घेऊन चल…
(बाप्पा मुषकाच्या पाठीवर बसतात अन् मुषक ‘केपासुरी’-‘खाटवडगाव’च्या रस्त्याला लागतात.)
क्रमशः उर्वरित उद्याच्या अंकात…
(हे सदर केवळ मनोरंजनासाठी आहे. यातून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. यातील लिखानाचा जिवीत वा मृत व्यक्तींशी संबंध नाही. असलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा.)

मुषकराज : भाग 1 ‘चेडेश्वरी’ दिस्तोय का बघ…

मुषकराज भाग 2 ः बजरंगी सॅनीटायझर…

मुषकराज भाग 3 : ‘कवडीची किंमत देत नाय’

मुषकराज भाग 4 : त्यांना वाटतं आभाळ कोसळलं

मुषकराज भाग 5 :परळी जिल्हा…

मुषकराज भाग 6 ः थर्मल गन

मुषकराज भाग 7 ः ‘बदका’चं डुबूक डुबूक


Tagged