शिवसेनेची बातमी जरी लागली तरी माझी आई टीव्ही बंद करते!

न्यूज ऑफ द डे बीड राजकारण

बीडच्या माजी जिल्हाप्रमुखांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र

बीड : कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना कोणी कोणी साधा फोन केला नाही, सांत्वनही केले नाही. अडचणीच्या काळात कारण नसताना अनपेक्षितपणे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाच्या जबाबदारीतून मुक्त केले. यामुळे टीव्हीवर शिवसेनेची बातमी जरी लागली तरी माझी आई टीव्ही बंद करते. माझ्याकडे तिला समजाऊन सांगण्याचे शब्द व हिंमत पण नाही, हे काही शब्द आहेत बीडचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या भावनिक पत्रातील. त्यांनी बुधवारी (दि.२९) थेट ठाकरे यांना हे पत्र लिहले आहे.

राज्याच्या राजकारणात राजकीय उलथापालथ सुरू असून शिवसेनेला एकापाठोपाठ एक धक्का बसत आहे. यातच बीडचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी एक भावनिक पत्र लिहून पक्षांतर्गत नेत्यांकडून पक्षश्रेष्ठींची दिशाभूल केली जात असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. हे पत्र ई-मेलद्वारे उद्धव ठाकरे यांना पाठविले असून समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे.

सचिन मुळूक यांनी लिहलेले पत्र जशास तसे..

मा. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब, शिवसेना पक्षप्रमुख
माजी मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य, मुंबई

सप्रेम जय महाराष्ट्र…!
विषय :- आदरणीय साहेब… गेली २५ वर्ष एकनिष्ठपणे शिवसेनेत काम करतोय. १९९७ ला शाखाप्रमुखा पासून सुरूवात ते डिसेंबर २०१७ ला शिवसेना जिल्हाप्रमुख पदापर्यंत जायला माझ्या सारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला खूप संघर्ष करावा लागतो. साडेतीन वर्षाच्या काळात २ वर्ष कोव्हिडमध्ये मी माझ्या सहकारी शिवसैनिकांनी अक्षरशः कोरोना सेंटरमध्ये जाऊन लोकांची सेवा केली. हे सर्व करत असतांना कोरोनाने माझ्या घरात भयंकररित्या प्रवेश केला.

९ ऑक्टोबर २०२० ला माझ्या वडिलांना कोरोनाची लागण झाली. एक महिना मृत्युशी झुंज – दिली. अखेर ९ नोव्हेंबर २०२१ ला त्यांचे निधन झाले. कुटूंबावर मोठं संकट कोसळलं. आमच्या डोक्यावरील छत्र हरवले. घरात मी मोठा असल्याने सर्व कुटूंबाला सावरण्याची जबाबदारी माझ्यावर आली. हे सर्व माझ्यासाठी अनपेक्षित होते.

७ जानेवारी २०२१ ला आई कोरोनाग्रस्त झाली. ती बरी होईपर्यंत २३ एप्रिल २०२१ ला माझी मुलगी व पत्नी कोरोनाच्या विळख्यात सापडले. २८ एप्रिल २०२१ ला मी कोव्हिड पॉझिटीव्ह आलो. माझा स्कोअर २१ झाला. प्रचंड वेदना, त्रास होत होता. मरणाच्या दारात उभा होतो. आता मी वाचत नाही असं वाटु लागलं. पण आपल्या सर्वांच्या आशिवार्दाने २२ मे २०२१ रोजी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला.

अश्या परिस्थितीत मी व माझं कुटूंब प्रचंड दुःखात असतांना विचारपूस, आधार देण्याऐवजी अवघ्या एक महिन्याच्या आत २२ जून २०२१ रोजी मला जिल्हाप्रमुख पदावरून अचानकपणे काढलं गेलं.

आधीच काय कमी त्रास वेदना होत्या त्यात आणखी भर पडली. माझं कुटूंब एवढ्या मोठ्या संकटात असतांना सांत्वन करण्याऐवजी चुकीच्या वेळेला मला पक्षाने अत्यंत वाईटरित्या वागणुक देऊन जबाबदारीतून मुक्त केले. याचा प्रचंड आघात माझ्या आई, पत्नीवर झाला.

टीव्हीवर शिवसेनेची बातमी जरी लागली तरी माझी आई टीव्ही बंद करते. माझ्याकडे तिला समजाऊन सांगण्याचे शब्द व हिंमत पण नाही. त्यामुळे माझं कुठं चुकलं यासाठी वर्षभर मी वरिष्ठांना सातत्याने विचारणा केली. परंतु कसलेच उत्तर मिळालं नाही. शेवटी पदे येतात जातात. पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे. परंतु कधी कधी वाटतं माझ्यावर (तुमच्या जिल्हाप्रमुखावर) बेतलेल्या संकटाची माहिती आपणास कळली असती तर नक्कीच माझे पक्षप्रमुख म्हणून आपण माझ्या बाबतीत सहानभुतीपूर्वक विचार केला असता. निदान सांत्वनपर फोन तरी नक्कीच केला असता. परंतु माझं दुर्दैव काही लोकांनी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहचवू दिली नाही.

मोठ्या साहेबांना प्रत्यक्ष सहवास आम्हाला कधी मिळाला नाही. पण त्यांच्या विचारांची प्रतारणा कधी होऊ दिली नाही. मला माझं पद परत मिळावं या स्वार्थासाठी मी सांगत नाही. पक्षाने मला भरपूर दिले. यातच मी समाधानी आहे.

आमच्या सारख्या सर्व सामान्य कुटूंबातील व्यक्तींना जिल्हाप्रमुख पदापर्यंत पोहचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. फक्त माझ्या सोबत सुडभावनेतून व वैयक्तीक द्वेषातून जे घडलं तस इतरांच्या बाबतीत घडू नये म्हणून माझ्या भावना आपल्यापर्यंत पोहचावी एवढीच माफक अपेक्षा होती. म्हणून हे पत्र आपणास पाठवत आहे.

जय महाराष्ट्र
आपला स्नेहांकीत
सचिन अर्जुनराव मुळूक

हेच ते पत्र…

1
2
Tagged