dhananjay munde

धनंजय मुंडे- देवेंद्र फडणवीसांची गुप्त भेट !

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र राजकारण
राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ
मुंबई दि.1 : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगताच येत नाही. कालपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हणता म्हणता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. फडणवीस सत्तेबाहेर राहणार हा निर्णय त्यांनीच जाहीर केल्यानंतर सायंकाळी साडे सात वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आताही अशीच मोठी घडामोड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी पहायला मिळाली. अजित पवार यांचे विश्वासू धनंजय मुंडे यांनी काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतली. ही बातमी आज सकाळी वार्‍याच्या वेगाने महाराष्ट्रात पसरली अन् संपूर्ण राजकारणाच आता पुन्हा एकदा हादरून गेले आहे.

विविध माध्यामांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार धनंजय मुंडे हे गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास देवेंद्र फडणीवस यांच्या सागर बंगल्यावर गेले होते. याठिकाणी फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर धनंजय मुंडे हे सागर बंगल्यातून बाहेर पडले. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी झाली, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. परंतु, सध्याची अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या गटातील मानले जातात. 2019 मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर शपथ घेतली होती तेव्हादेखील धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या गटात होते. त्यामुळे आतादेखील काही नवीन राजकीय समीकरणांची नांदी होऊ घातली आहे का, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. राज्यातील गेल्या काही तासांमधील राजकारणावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. त्यांना कोरोना झाल्यामुळे ते सध्या इतरांपासून अंतर राखून आहेत. मात्र, त्यांच्या मर्जीतील असलेले धनंजय मुंडे आता फडणवीसांना भेटल्याने आगामी काळात आणखी नव्या राजकीय घडामोडी पाहायला मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धनंजय मुंडेंकडून प्रतिक्रीया नाही
सकाळपासून विविध माध्यमांमध्ये या बातम्या चालत आहेत. मात्र अद्यापही धनंजय मुंडेंकडून याबाबत अधिकृतपणे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. किंवा या भेटीचा त्यांनी इन्कार देखील केलेला नाही. धनंजय मुंडे फडणवीसांना शुभेच्छा द्यायला गेले म्हणावे तर अद्यापपर्यंत शुभेच्छांचे फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर देखील केलेले नाहीत. त्यामुळे पडद्याआड बर्‍याच राजकीय घडामोडी घडत आहेत हे म्हणायला खूप वाव आहे.
(टिप- बातमीतील फोटो प्रतिकात्मक आहे.)

Tagged