indian farmer

डिलर नव्हे किलर!

न्यूज ऑफ द डे बीड शेती

59 हजारांचा युरिया घेताना 25 हजार रुपयांच्या इतर खताची खरेदी सक्तीची

डिलर नव्हे  किलर!

महेश होके । माजलगाव

खरीप हंगामासह ऊसासाठी शेतकर्‍यांकडून युरियाची प्रचंड मागणी आहे. हीच गरज हेरून डिलरकडून कृषी दुकानदारांना लिंकिंगचा फास दिला जात आहे. या फासातून आपली मान सोडवून घेण्यासाठी कृषी विक्रेते शेतकर्‍यांच्या मानगुटीवर पाय देऊन इतर खत खरेदी करण्याची सक्ती करीत आहे. आतापर्यंत यात कृषी दुकानदारच दोषी, असे सांगितले जायचे. परंतु ‘कार्यारंभ’ने जेव्हा याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी युरिया खत पुरविणारे डिलरच याला जबाबदार असल्याचे पुढे येत आहे. 59 हजार रुपयांचा खत खरेदी करताना इतर 25 हजार रुपयांचा निकृष्ठ दर्जाचा खत शेतकर्‍यांच्या माथी मारल्यामुळेच शेतकरी कर्जबाजारी होत असून त्यातून तो आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे हे ‘डिलर नसून शेतकरी किलर’ असल्याचेच दिसत आहे.

दैनिक ‘कार्यारंभ’ने सध्या बाजारपेठेत लिंकिंग पध्दतीने शेतकर्‍यांची होत असलेल्या लुटीवर वृत्त प्रकाशित केले होते. यावर आम्ही अनेक कृषी दुकानदारांना बोलते केले, ‘त्यातून अनेक दुकानातून हे आम्हाला नाविजालाने करावे लागतंय. आमच्या अडचणी समजून घ्या, आमची परिस्थिती तोंड दाबून बुक्याचा मार…’ अशी झाली आहे.

युरिया वगळता सर्वच रासायनिक खते नियंत्रणमुक्त केल्याने खताचे दर गगणाला भिडले आहेत. यात होणारी वाढ शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेर आहे. परिणामी शेतकर्‍यांचा कल युरिया खताला सर्वाधिक पसंती देत आहे. सध्या युरिया खरेदीसाठी बाजारपेठेत शेतकरी गेला असता, त्याला इतर खते घेण्याची सक्ती (म्हणजेच लिंकिंग) केली जात आहे. वास्तविक कृषी विक्रेत्यांकडून होत असलेली लिंकिंग ही अन्यायकारक दिसत आहे. 

शेतकर्‍यांना अडचणीच्या काळात विनाकारण आर्थिक भुर्दंडाचा भार उचलावा लागत आहे. मात्र या मागील वास्तव असे आहे की, डिलरकडून युरिया आर्थिक फायदा होत नाही. त्यामुळे व्यापारी डोके लढवून युरीयाच्या आढून इतर चढ्या भावाने खते देवून कृषी विक्रेत्यांवर लिंकिंगचा फास टाकला जात आहे. याच फासातून बचावासाठी कृषी विक्रेत्यांकडून नाविजालाने दैनंदिन संबंध व ग्राहक असणार्‍या शेतकर्‍यांच्या मानगुटीवर पाय दिला जात आहे. ह्या सर्व बाबीवर कृषी विभाग नेमके कुठे आपली पथके अन् पारदर्शी कारभारासाठी कर्तबगारी दाखवत आहे. हा संशोधनाचा विषय असला तरी, ऐन पेरणीच्या वेळी आर्थिक भुर्दंड सहन करत जगाचा पोशिंदा आपले मरण मरत आहे.

डिलरकडून अशी होतेय लिंकिंग

डिलरकडून कृषी दुकानदारांना 10 टन युरिया घ्यायचा तर 10 पोते इतर खत लिंकिंग करून दिला जातो. लिंकिंगच्या पोत्यात 25 पुढे असतात. युरियासाठी त्यांना 59 हजार मोजावे लागतात तर लिंकिंग खतासाठी 25 हजार रूपयांची बळजबरी खरेदी करावी लागते. अशा अडचणीच्या काळात 25 हजार रुपयांचा खर्च करायचा म्हणजे शेतकर्‍यांचं मरणच आहे.

आम्ही शेतकर्‍यांचीच लेकरं, आम्हाला त्याचं दुखः ठावूक

आम्ही शेतकर्‍यांची मुलेच आहोत. शेतकर्‍यांच्या समस्या आम्हाला चांगल्या ज्ञात आहेत. त्यांचे दुखः, अडचणी ह्या आम्ही भोगलेल्या आहेत. परंतू ना विजालाने आम्हाला डिलरकडून होत असलेली लिंकिंची सक्ती छातीवर दगड ठेवून, शेतकर्‍यांवर  लादावी लागत आहे, असे नाव न छापण्याच्या अटीवर शेतकरी पुत्र असलेल्या कृषी विक्रेत्यांने दैनिक कार्यारंभशी बोलताना सांगितले.

डिलरवर कृषी विभागाने लक्ष देण्याची गरज

विविध खतांच्या डिलरकडून कृषी विक्रेत्यांना युरियासाठी लिंकिंगची सक्ती केली जात आहे. परिणामी कृषी विक्रेत्यांकडून ही लिंकिंग पध्दत पुढे शेतकर्‍यांवर लादली जात आहे. मात्र यावर कृषी विभागाकडून कृषी विक्रेत्यांविरूध्द कारवाईचा फास आवळल्या जातोय. परंतू डिलर मात्र आपले काम साधून बाजूला सरकत आहेत. अधिकारी जर खेरेच शेतकरी पुत्र असतील तर त्यांनी आगोदर डिलरला लाथा घालून सरळ केले पाहीजे.

Tagged