आष्टीत ४५९ मतदारांची नावे बोगस

आष्टी कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

जिल्हाधिकार्‍यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना पाठवला अहवाल

बीड : आष्टी नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेला वेग आलेला असतांनाच तब्बल ४५९ मतदारांची नावे बोगस लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी घेतलेल्या सुनावणीअंती जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना अहवाल पाठवला आहे. सदरील नावे मतदार यादीतून वगळता येईल किंवा कसे? याबाबतचे मार्गदर्शन जिल्हाधिकार्‍यांनी मागवले आहे.

आष्टी नगर लपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मागवलेल्या आक्षेपात अनेकांनी मतदार यादीतील नावांवर आक्षेप नोंदवला होता. तहसिलदार विनोद गुंडमवार आणि नायब तहसिलदार दळवी यांच्या उपस्थितीत आक्षेपाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्याचवेळी तालुका व गावातील काही नावे यादीत लावल्याचा आक्षेप घेत वाद देखील झाला होता. दरम्यान नाजीम शेख व इतर चौघांनी मतदार यादीतील नावावर आक्षेप घेतला होता. बनावट कागदपत्राच्या आधारे नावे लावण्यात आली असुन ती नावे वगळावीत. या आक्षेपाच्या अनुषंगाने सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी संबंधित मतदार व आक्षेपक यांना नोटीस देऊन सुनावणी घेतली. सुनावणी व्यतिरीक्त कार्यालयीन स्तरावर पथक नियुक्त करून संबंधित मतदारांच्या नवीन वास्तव्याच्या पत्त्यावर जाऊन पंचनामे व चौकशी केली असता त्यामध्ये संबंधित मतदार दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आले. त्या अनुषंगाने सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी ४५९ मतदारांच्या नावासह अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला. त्यानुसार जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी राज्य निवडणुक आयुक्तांना अहवाल पाठवला असून सदरील ४५९ नावे नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय तयार करण्यात आलेल्या मतदार यादीतून वगळण्यात येईल किंवा कसे? याबाबतचे मार्गदर्शन मागवले आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राज्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tagged