अधिकारांचा वापर करा आणि लसीकरण वाढवा

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

जिल्हाधिकार्‍यांचे सर्व यंत्रणांना आदेश; लसीकरणाचा आढावा

बीड : जिल्ह्यात 66 टक्के लसीकरण झाले असून, नागरिकांनी पुढे येऊन लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. अजुनही अनेकांनी लस घेतलेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांनी आपापल्या अधिकारांचा पूर्णपणे वापर करावा आणि लसीकरणाचा जिल्ह्याचा टक्का वाढवावा, असे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत.

जिल्ह्यातील लसीकरणाचा आणि नियोजनाचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी तब्बल अडीच तास त्यांनी आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक आर राजा, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मंजुषा मिसकर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रौफ शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा पुढे म्हणाले की, जिल्ह्याचे लसीकरण वाढविण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्याअनुषंगाने प्रशासनाकडून लसीकरण वाढीवर भर दिला जात आहे. आता विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम आणखी गतीमान करण्यासाठी सर्व अधिकार्‍यांनी आपापल्या अधिकारांचा वापर करावा. लस घेणार नसल्यास त्याचे विविध शासकीय लाभ त्वरीत बंद करावे. दुकाने, आस्थापनांमध्ये जाऊन लस घेतली की नाही? याची चौकशी करावी. प्रमाणपत्र नसल्यास दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी यंत्रणांना दिले आहेत. यावेळी काही उपजिल्हाधिकारी, सर्व तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, मुख्याधिकारी यांच्यासह त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Tagged