पवने हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

तीन भावांच्या हत्येने हादरले होते बीड

बीड : तालुक्यातील पिंपरगव्हाण येथे दि.27 जुलै 2019 रोजी घडलेल्या तीन सख्ख्या भावांच्या हत्याकांडाने बीड जिल्हा हादरला होता. या प्रकरणातील एका आरोपीचा न्यायालयीन कोठडीत असताना सोमवारी सायंकाळी (दि.30) कारागृहात मृत्यू झाला आहे.
किसन काशिनाथराव पवने (वय 71, रा.आनंदवन सोसायटी, बीड) असे मयत आरोपीचे नाव आहे. त्यांच्यासह त्यांचा मुलगा सचिन आणि कल्पेश या तिघांनी मिळून मयताच्या तीन सख्ख्या भावांचा धारदार हत्यारांनी भोकसून खून केला होता. या प्रकरणाने बीड जिल्हा हादरला होता. त्यावेळी बीड ग्रामीण पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यांना तीन वेळा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. परंतु न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला. कोरोना काळात किसन पवने यांना क्षयरोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर काही काळ अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात उपचार केले. तेथून त्यांना बीड येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. न्यायालयीन कोठडीत असताना उपचारादरम्यान त्यांचा सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. सध्या त्यांचा मृतदेह जिल्हा रूग्णालयातील शवगृहात असून कारागृह प्रशासनाच्या प्रशासकीय प्रक्रियेनंतर इन कॅमेरा शवविच्छेदन होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

उच्चशिक्षीतांचा आरोपीत समावेश
आरोपींमध्ये मुख्य सूत्रधार असलेला कल्पेश हा वकील होता. त्याने हा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. तर दुसरा आरोपी सचिन हा डॉक्टर आहे. आरोपींमध्ये उच्चशिक्षीतांचा समावेश आहे.

Tagged