आम्ही एकनाथ शिंदेंसोबत राहणार : सचिन मुळूक

बीड

संपर्कप्रमुख जाधव दलाल, खैरेंवरही साधला निशाणा

बीड : शिवसैनिक म्हणून आमची भूमिका मांडत आहोत. २५ वर्षांपासून शिवसेनेत काम केले आहे. असे अनेकांनी योगदान दिले. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण महविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून छळ होऊ लागला. परंतु अगोदर आमच्या बोलण्याला किंमत नव्हती. मात्र आता बोलण्याची वेळ आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही खदखद बाहेर पडत आहे. त्यामुळे वेगळा निर्णय घेण्याची वेळ शिवसैनिकावर आली आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे, स्व.आनंद दिघे यांची शिवसेना व हिंदुत्व वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी राहणार आहोत, अशी भुमिका शिवसनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी जाहीर केली.

बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपचे संदीप उबाळे, वैभव जाधव आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना सचिन मुळूक म्हणाले, माझ्यासह बीडमधील अनेकांचा हाच निर्णय आहे. येणाऱ्या काळात ते निर्णयही घेतील. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारावर आम्ही चालणार आहोत. आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसैनिक आहोत. त्यांचीच शिवसेना अनेक शिवसैनिकांना मान्य आहे. बीड जिल्ह्यातील ७० टक्के आजी-माजी पदाधिकारी संपर्कात आहेत. त्यांच्यासोबत बैठक झाली. लवकर तेही निर्णय घेणार असल्याचे मुळूक म्हणाले. तसेच, संपर्कप्रमुख आनंद जाधव संपर्क प्रमुख नव्हे तर दलाली करणारे आहेत. त्यांची माजलगाव येथील वाळूच्या धंद्यात भागीदारी आहे, त्याची पक्षाने चौकशी केली पाहिजे. माझ्या घरात दुःख असताना मला पदावरून दूर केले. त्याबद्दल दुःख नाही, पण त्यांनी माझ्या घरत असलेले दुःख, तो प्रसंग वरिष्ठांना कळवला नाही. त्यांनी पैश्यासाठी पदाधिकाऱ्यांचा छळ केला आहे. आम्ही त्यांच्या दबावाला बळी पडणारे नसल्यामुळे आम्ही पदापासून दूर झालो. एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले, येथील खदखद त्यांना सांगितली आहे. येथील शिवसैनिकांचे हाल होऊ नयेत याची दखल त्यांच्याकडून घेतली जाणार आहेत. चंद्रकांत खैरे यांनी माझ्याबद्दल पक्षाकडे चुकीची माहिती दिली. संभाजीनगरचे नामकरण झाल्याचा आनंद त्यांनी साजरा केला. मात्र त्यांना याचा नव्हे तर मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे पायउतार झाल्याचा आनंद जास्त झाला असल्याचा आरोपही मुळूक यांनी केला.