बोगस लायसन्स देणाऱ्या एजंटवर फसवणुकीचा गुन्हा!

बीड

बीड उप प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई
बीड दि.21 : येथील आरटीओ कार्यालयात विविध पक्षाचे, पुढार्‍यांचे कार्यकर्ते येथील यंत्रणेवर दबाव आणून बोगस कामे करत असल्याचे सर्वश्रुत होते. मात्र मागील काही दिवसांपासून आरटीओ विभाग ‘ॲक्शन मूडमध्ये’ आलेला दिसत आहे. बोगसगिरी करणाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहेत तर दादागिरी करणाऱ्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होत आहे. त्यामुळे येथील दलालांचा सुळसुळाट संपत असल्याचे दिसत आहे. शनिवारी (दि.21) बनावट लायसन देणाऱ्या एका एजंटावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे इतर एजंटांच्या तंबूत घबराट निर्माण झाली आहे.

बक्शू अमीर शेख (रा.शाहू नगर, बीड) असे बनवट लायसन्स देणाऱ्या एजांटाचे नाव आहे. पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, एजंट शेख बक्शू हा कुठल्याही कागदपत्रांची खातरजमा न करता केवळ मोबाईलवर अर्जदाराचे आधार कार्ड घेऊन त्यांच्याकडून अधिक पैसे घेऊन बोगस लायसन्स देत होता, याची माहिती उपप्रादेशिक परिवहन, बीड यांना प्राप्त झाली माहिती मिळाल्यानंतर त्यांनी डमी अर्जदार म्हणून माधव कोळेकर यांच्यामार्फत शेख बक्शू यांच्याशी संपर्क केला. यावेळी शेख याने कुठलीही चाचणी न देता दोन हजार रुपयात शिकाऊ लायसन्स व्हाट्सअपवर पाठवतो असे सांगितले. त्यानंतर कोळेकर यांनी त्याच्या व्हाट्सअपवर कागदपत्रे व फोन पे द्वारे दोन हजार रुपये पाठवले. कुठलीही प्रत्यक्षात स्वतः खतर जमा न करता, प्रत्यक्षात स्वाक्षरी न घेता, फक्त अधिकचे पैसे घेऊन लायसन्स व्हॉटसअपवर पाठवले. शिकवू लायसन पाठवले. बनावट लायसन्स देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शेख बक्शू यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांच्या फिर्यादीवरून बनावट लायसन्स देऊन शासनाची फसवणूक केली, म्हणून कलम 420, 464, 468, 471 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे करत आहे.

वाहन धारकांची अनेक कामे ऑनलाईन होतात, कुठलेही अडचण असल्यास थेट उप प्रादेशिक परिवहन विभागाशी संपर्क करावा, अधिकचे पैसे देऊन कुठल्याही एजंटच्या अमिषाला बळी पडू नये. तसेच बोगसगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
– स्वप्नील माने
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड

Tagged