केज 50 वर्षे राखीव, तरीही खरा वंचित उपेक्षीतच!

बीड

बालाजी मारगुडे । बीड
दि.5 : केज विधानसभा मतदारसंघ 1978 पासून एससी या प्रवर्गासाठी राखीव आहे. परंतु आजपर्यंत या मतदारसंघावर खर्‍याखुर्‍या दलीत व्यक्तीला आपले वर्चस्व प्रस्थापित करता आलेले नाही. 1990 साली या मतदारसंघातून विमलताई मुंदडा पहिल्यांदा भाजपाकडून विधानसभेवर गेल्या. तेव्हापासून 2012 पर्यंत त्यांनी कायम या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. (1999 मध्ये त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता) 2012 मध्ये मुंदडा यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. त्यावेळी या जागेवर पृथ्वीराज साठे यांनी नशिब आजमावले. त्यात ते यशस्वी देखील ठरले. परंतु त्यांना अवघी 2 ते अडीच वर्ष संधी मिळाली. 2014 मध्ये प्रा. संगीताताई ठोंबरे यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला. 2019 मध्ये भाजपा पक्षाने त्यांना डावलत पक्षांतर करून आलेल्या स्व. विमलताई मुंदडा यांच्या सून नमिताताई मुंदडा यांना तिकिट देत आमदार होण्याची संधी दिली. नमिताताई यांनी त्यावेळी माजी आ. पृथ्वीराज साठे यांचा पराभव केला होता.

MAHAYUTI
MAHAYUTI

काय आहे महायुतीची स्थिती?
महायुतीत केज विधानसभेची जागा भाजपच्या वाट्याला आहे. या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी जागा मिळविण्याच्या देखील स्पर्धेत नाहीत. त्यामुळे भाजपकडून यावेळीही नमिता मुंदडा यांना तिकिट मिळण्याची संधी आहे. दुसरा कोणी या स्पर्धेत देखील नाही. केजमध्ये जी मुंदडांची ताकद तीच महायुतीची ताकद. जी पंकजाताई मुंडेंची ताकद तीच महायुतीची ताकद. जी धनंजय मुंडे यांची ताकद तीच महायुतीची ताकद. अशी स्थिती आहे.

MAHAVIKAS-AGHADI-LOGO
MAHAVIKAS-AGHADI

काय आहे महाविकास आघाडीची स्थिती?
महाविकास आघाडीकडून आतापर्यंत माजी आ. पृथ्वीराज साठे यांची दावेदारी आहे. परंतु दोनच दिवसांपुर्वी माजी आ. प्रा. संगीताताई ठोंबरे यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेत आपल्याला केज विधानसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पृथ्वीराज साठे यांना आता स्पर्धा निर्माण झालेली आहे. हा मतदारसंघ म्हणजे खा. बजरंग सोनवणे यांचे होमपीच आहे. सोनवणे यांनी जर ऐनवेळी या मतदारसंघातून आणखी कोणी चेहरा पुढे केला तर नवल वाटायला नकोय.

मनोज जरांगे फॅक्टरचा प्रभाव किती?
या मतदार संघातून बजरंग सोनवणे यांना 22 हजार मतांची लीड मिळालेली होती. त्यावरून या मतदारसंघात देखील मनोज जरांगे फॅक्टर चालल्याचे दिसून येते. आगामी निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांकडून सोशल इंजिनीअरिंगच्या नावाखाली एखादा चेहरा दिला तर इतर सगळ्यांना मोठा धक्का बसू शकतो.

ओबीसी फॅक्टर चालेल का?
या मतदारसंघात ओबीसीमधील वंजारी समाजाची संख्या मोठी आहे. पंकजाताई मुंडे, धनंजय मुंडे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर या मतदारसंघात आहे.

दिन दलित, आंबेडकर चळवळींसाठी मोठी संधी
केज मतदारसंघ हा 1978 पासून राखीव आहे. परंतु इथून निवडून गेलेले कोणतेही लोकप्रतिनिधी विधासभेत जावून या जातीची प्रश्न मांडत नाहीत. बीड जिल्ह्यात दलीतांचे प्रश्न मांडणारे, बाबासाहेबांच्या संविधानावर बोलणारे अनेक नेते राज्य, देश आणि अंतरराष्ट्रीय पातळीवर देखील काम करताना दिसतात. परंतु त्यातील एकाही नेत्याने आपण केजचे प्रतिनिधीत्व करायला हवे यासाठी प्रयत्न केले नाहीत. केज मतदारसंघ आंबेडकर चळवळींसाठी मोठी संधी होता. महायुती किंवा महाविकास आघाडीत इतरही अनेक दलीत संघटना सहभागी आहेत. परंतु या पक्षांनीही कधी केजची जागा आम्हालाच सोडा म्हणून मागणी केलेली नाही, त्यामुळे 50 वर्षे राखीव असुनही खर्‍या उपेक्षीताला येथून संधी मिळाली नाही आंबेडकरी चळवळीचे दुर्दैवं म्हणावे लागेल.

नमिताताई मुंदडांना पुन्हा संधी मिळणार का?
नमिताताई मुंदडा nameeta mundada यांनी या मतदारसंघात विकासाची मोठी कामे केली आहेत. कोट्यावधी रुपयांचा निधी त्यांनी केज मतदारसंघात आणला आहे. कधी नव्हे ती अंबाजोगाई शहरातील रस्त्यांची कामे दर्जेदार झाली आहेत. ग्रामीण भागातील विजेचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, स्वाराती रुग्णालयाचा प्रश्न आदींबाबत नमिताताई मुंदडा नेहमी जागरूक असतात. नमिताताई मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा हे दररोज लोकांच्या सेवेत असतात. प्रत्येक दिवशी 10 ते 12 गावांचा दौरा केल्याशिवाय त्यांचा दिवस कडीला जात नाही. लग्न समारंभ, सप्ताह, सत्यनारायण, मुंज, बारसे, अंत्यविधी असा कुठलाच वैयक्तीक जनसंपर्काचा विषय मुंदडा कुटुंब टाळत नाही. त्यामुळे मतदारसंघात त्यांच्याबद्दल नेहमीच आपुलकी असते. स्वतः नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा आणि आ. नमिता मुंदडा हे तिघेही सतत जनसंपर्कात असल्याने मुंदडा यांना माऊथ पब्लिसीटी दांडगी आहे. परंतु मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्नात त्यांना मराठा समाजाच्या मतांचा फटका बसू शकतो. मराठा मतदार आजही भाजपच्या विरोधात आहे. ही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. लोकसभेत ज्या प्रमाणे आडवा-आडवी झाली तशीच विधानसभेला देखील मुंदडा यांच्या वाटेला येऊ शकते.

pruthviraj sathe
pruthviraj sathe

माजी आ. पृथ्वीराज साठेंना संधी मिळेल का?
माजी आ. पृथ्वीराज साठे pruthviraj sathe यांनी 2019 च्या निवडणुकीत नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात त्यांना यश आले नव्हते. मातंग समाजातून असल्याने हा समाज एकगठ्ठा साठे यांच्या पाठीशी आहे. सतत लोकात मिसळून त्यांच्याशी संपर्कात राहील्याने यावेळी साठे यांना मानणारा मोठा वर्ग तयार झालेला आहे. शांत, संयमी म्हणून लोक त्यांच्याकडे पाहतात. लोकसभेवेळी मराठा आरक्षण प्रश्नाची सहानुभूती शरद पवारांच्या पक्षाला मिळाली होती. पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाली, खा. बजरंग सोनवणे यांनी मीच स्वतः उभा आहे असे समजून काम केले तर साठे यांचे नशिब चमकू शकते. केज मतदारसंघातील इतरही छोट्या मोठ्या नेत्यांशी मुंदडा यांचे बिनसलेले असल्याने ते देखील पृथ्वीराज साठे यांना उघड, छुपी मदत करू शकतात. एकूणच सगळा जोडजमाव व्यवस्थित जुळून आला तर साठे दुसर्‍यांदा विधानसभेत दिसतील.

अंजली घाडगे – अंजली घाडगे anjali ghadage यांना केज मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात राहण्याचे सातत्य जमलेले नाही. प्रत्यक्षही नाही अन् सोशल मीडियावरही नाही. गुगलवर सर्च करायला गेले तर त्यांचे इनमिन चार फोटो सापडतात. त्या केवळ निवडणुका आल्या की उगवतात. मधले 4 वर्ष 9 महिने कुठे गायब असतात हे त्यांनाच ठावूक. केवळ हौस म्हणून त्या निवडणूक लढवतात की काय असाही कधी कधी प्रश्न पडतो. त्यामुळे त्या उभ्या राहील्या काय अन् न राहील्या काय? आता त्याचा फरक प्रमुख पक्षाला पडत नाही. त्या देखील जयंत पाटलांना भेटून आल्याचे समजते.

sangeeta thombare
sangeeta thombare

संगीता ठोंबरे देखील निवडणुकीच्या रिंगणात
मागच्या निवडणुकीत पक्षाने त्यांना थांबायचे सांगितल्याने त्यांनी एक ब्रेक घेतला. परंतु पुन्हा त्या आता मतदारसंघात सक्रीय झालेल्या आहेत. केज विधानसभेची आपण निवडणूक लढवणार अशी घोषणा त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे कालच त्यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन आपण केजमधून इच्छूक असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हा पक्ष त्यांच्याबद्दल काय विचार करतो हे पहावे लागेल. परंतु संगीता ठोंबरे sangeeta thombare निवडणुकीच्या रिंगणात आल्याने त्यांचा फटका प्रामुख्याने भाजपला बसण्याची शक्यता आहे.

खा. बजरंग सोनवणेंच्या मताला किंमत
केज मतदारसंघ हा खा. बजरंग सोनवणे bajrang sonwane यांचे होमपीच आहे. त्यामुळे खा. बजरंग सोनवणे इथून कोणाच्या नावाची शिफारस करतात हे महत्वाचे असणार आहे. कारण हा मतदारसंघ राखीव असल्या कारणाने आणि निवडणूक लढविणारा कोणताही उमेदवार तितका सक्षम नसल्याने त्यांना खा. सोनवणेंच्या पाठींब्यावरच अवलंबून रहावे लागणार आहे. पक्षाकडून देखील या मतदारसंघाची पूर्ण जबाबदारी खा. सोनवणे यांच्या खांद्यावर टाकली जाण्याची शक्यता आहे.

इतर नेत्यांचा मतदारसंघात प्रभाव
केज मतदारसंघात रमेश आडसकर, डॉ. अशोक थोरात, डॉ. नरेंद्र काळे, राजकिशोर मोदी, हारूण इनामदार, रजनी पाटील, व इतरही अनेक छोटे मोठे नेते पाच दहा हजार मतांची ताकद ठेवून आहेत. पैकी रमेश आडसकर माजलगावमधून इच्छूक आहेत. त्यांना कोणता पक्ष मैदानात उतरवतो त्या पक्षाच्या पारड्यात ते केजची मते देतील. डॉ. अशोक थोरात आणि नंदकिशोर मुंदडांचे सध्या कसलेच जमत नाही. डॉ. थोरात यावेळी मुंदडांविरोधात तन-मन-धन लावून प्रचार करणार असल्याचे समजते.

karyarambh
karyarambh

कार्यारंभला काय वाटते?
महाविकास आघाडीकडून जो उमेदवार येईल तो उमेदवार बजरंग सोनवणे हेच उभे आहेत असे समजून महाविकास आघाडी मतदान मागेल. तरच त्यांना सीट काढण्याची संधी मिळू शकते. पृथ्वीराज साठे हे शरदचंद्र पवार यांच्याशी एकनिष्ठ राहीलेले असल्याने पक्ष त्यांचा जास्त विचार करेल असे दिसते. प्रा. संगीता ठोंबरे ह्यांना महाविकास आघाडीने तिकिट नाकारले तर त्या वंचित आघाडीकडूनही निवडणूक रिंगणात येऊ शकतात, अशावेळी मतदारसंघात तिरंगी फाईट दिसू शकते. या मतदारसंघात मनोज जरांगे पाटील हे स्वतंत्रपणे उमेदवार देण्याची शक्यता कमी वाटते.

आतपर्यंत केज मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले लोकप्रतिनिधी
1962 गोविंदराव गायकवाड
1967 सुंदरराव सोळंके
1972 बाबुराव आडसकर
1978 भागुजी निवृत्ती सातपुते
1980 गंगाधर निळकंठ स्वामी
1985 भागुजी निवृत्ती सातपुते
1990 विमलताई मुंदडा
1995 विमलताई मुंदडा
1999 विमलताई मुंदडा
2004 विमलताई मुंदडा
2009 विमलताई मुंदडा
2012 पृथ्वीराज साठे
2014 संगीता ठोंबरे
2019 नमिता मुंदडा