भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या मागणीला यश
अंबाजोगाई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणीचे सत्र सुरू होते. शेतकऱ्यांचा हा मुद्दा भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी (दि.९) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला होता. यावेळी त्यांनी वीज कनेक्शन तोडणी तातडीने थांबविण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून शेतीचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश महावितरण कंपनीने शनिवारी (दि.१०) जारी केले आहेत.
वीज बिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. राज्यभरात सुरू असलेल्या या वीज कनेक्शन तोडणी सत्रामुळे शेतकरी वैतागले आहेत. वीज बिल वसुलीच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित करू नये, अशी मागणी होत होती. हीच मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मांडली. त्यानंतर राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार महावितरण कंपनीचे राज्याचे मुख्य अभियंता यांनी राज्यभरातील कृषी पंप ग्राहकांचा वीज पुरवठा चालू बिल किंवा थकबाकी वसुलीकरिता तसेच इतर कोणत्याही कारणास्तव पुढील आदेशापर्यंत खंडित केला जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्देशांची अंमलबजावणी काटेकोरपणे आणि तात्काळ प्रभावाने करण्यात यावी, असे आदेश मुख्य अभियंत्यांनी जारी केले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
