beed jilha parishad

उमराई : रोहयो गैरव्यवहार प्रकरणात अखेर कारवाई

न्यूज ऑफ द डे बीड

ग्रामसेविकेची विभागीय चौकशी तर तिघांची सेवासमाप्ती; डॉ.गणेश ढवळे यांचा पाठपुरावा

अंबाजोगाई : तालुक्यातील उमराई ग्रामपंचायत अंतर्गत रोहयो कामात मयत, नोकरदारांच्या नावे निधी उचलण्यात आला होता. एकूण 6 लाख 7 हजार रूपयांचा अपहार झाल्याचे सामाजिक अंकेक्षणात 2020 मध्ये सिद्ध झाले होते. मात्र कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी प्रशासनाने तक्रार करून कारवाईसाठी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून याप्रकरणी ग्रामसेवकाची विभागीय चौकशी तर तिघांची सेवासमाप्ती करण्यात आली आहे. ही कारवाई बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी अजित पवार यांनी शुक्रवारी केली.

के.बी. चौधरी असे विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आलेल्या तत्कालीन ग्रामसेविकेचे नाव आहे. तर भास्कर ज्ञानोबा फुंदे, संगणक परिचालक नितीन जनार्दन केंद्रे असे सेवासमाप्ती झालेल्या ग्रामरोजगार सेवकाचे नाव आहे. तसेच, क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर आत्मा पवार यांच्या सेवासमाप्तीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. ग्रामरोजगार सेवकांनी बनावट जॉबकार्ड तयार करणे, नितीन जनार्दन केंद्रे यांच्या नावे 1 लाख 73 हजार 04  रूपये बनावट मजूर दाखवून मजुरीची रक्कम अदा करणे, 3 व्यक्तींच्या नावे रक्कम 1 लाख 85 हजार 400, फुंदे भास्कर ज्ञानोबा (स्वतःच्या नावे) ग्रामरोजगार सेवक यांच्या नावावर रक्कम 5 हजार 356 काढण्यात आल्याची अनियमितता केल्याचे सिद्ध झाल्यामुळे त्यांची सेवा समाप्त करण्यात आली. संबंधिताविरूद्ध महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा कलम 25 नुसार 1000 रूपये दंडाची शास्ती करण्यात आली. संगणक परिचालक नितीन केंद्रे यांच्या 4 वेगवेगळ्या बँक खात्यावरून रक्कम 1 लाख 73 हजार 40 रूपये काढून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अनियमितता केल्यामुळे त्यांची संगणक परिचालक पदाची सेवा समाप्त करण्यात आली. त्यांच्यावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा कलम 25 नुसार 1000 रूपये दंडाची शास्ती करण्यात आली आहे. तर क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर आत्मा पवार यांच्या सेवासमाप्तीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यांनी बनावट जॉबकार्ड तयार करून बनावट मजूर दाखवून अपहार केल्याचा ठपका ठेवला आहे. तसेच, तत्कालीन ग्रामसेविका के.बी. चौधरी यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करून आपल्या गैरकृत्याबाबत आपल्यावर महाराष्ट्र जिल्हा परीषद जिल्हा सेवा(शिस्त व अपिल)नियम 1964 मधील 4 मधील कोणतीही शास्ती लाऊन त्याप्रमाणे का कार्यवाही करू नये याबाबत 10 दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याविषयी लेखी पत्र दिले.

वरिष्ठ अधिकार्‍यांमुळे कारवाईस दफ्तर दिरंगाई : डॉ.गणेश ढवळे
रोहयो अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात वरिष्ठ आधिकारी जाणीवपूर्वक भ्रष्टाचार प्रकरणात अधिकार्‍यांवर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत. उमराई येथील प्रकरणात विभागीय आयुक्तांना तक्रार करून अजित पवार, प्रदिप काकडे यांच्यावरच कारवाई करण्यात यावी अशी तक्रार केल्यानंतर विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून सुनावणी घेण्यात आली. आणि मग कारवाई करण्यात आली. केज तालुक्यातील रोहयो अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात अजून मोठ्या प्रमाणात कारवाई करणे बाकी असून कारवाईस जाणीवपूर्वक विलंब लावण्यात येत आहे.

Tagged