माझी छाती फाडली तर अजित पवार, धनंजय मुंडेच दिसतील!

केज न्यूज ऑफ द डे बीड

बजरंग सोनवणे : पक्षाचा निर्णय मान्य


बीड : माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद काढले म्हणून काही कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांचे गैरसमज दूर करणार आहे. आपल्याला पक्षाचा निर्णय मान्य आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके यांच्या शब्दावर विश्वास ठेऊन आपण राष्ट्रवादीतच काम करणार आहे. माझी छाती फाडली तर अजित पवार, धनंजय मुंडे हेच दिसतील, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी केले आहे.

जिल्हाध्यक्षपद बदलानंतर बजरंग सोनवणे हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर ते पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. बीडमध्ये शनिवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर उबाळे, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय उर्फ पिंटू ठोंबरे, बंडू चौधरी, नगरसेवक रामचंद्र गुंड, प्रेमचंद कोकाटे आदींची उपस्थिती होती.

बजरंग सोनवणे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला 4 वर्षे 8 महिने जिल्हाध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली. पक्षाने पद बदलाबाबत घेतलेला निर्णय मला मान्य आहे. आपण सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेलो आहे, माझ्या घरात साधा ग्रामपंचायत सदस्यही कधी नव्हता. राजकारण करताना वैयक्तिक चारित्र्य सांभाळत मी काम केले, ही माझी ओळख आहे. संख्या बळ नसताना जिल्हा परिषद ताब्यात आणली. पक्षादेशानुसार मी अध्यक्षपदाचा त्याग केला. त्यामुळे ज्यांना पदे मिळाली, ते माझे जिल्हाध्यक्ष पद बदण्यासाठी जातात ही खंत आहे. मी कोणत्याही अवैध धंदे, गैरप्रकारांना बळ देण्यासाठी पदाचा गैरवापर केला नाही. याचा मला रास्त अभिमान आहे. पराभवाचा कसलाही परिणाम पक्ष संघटनेवर होऊ दिला नाही. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडली. माझे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, 61 ग्रामपंचायती माझ्या सोबत आहेत. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करू. जनतेच्या आशिर्वादाने मी राजकारण करतोय. धरसोड करून राजकारणात यश येत नाही. जिल्हाध्यक्ष पद गेले म्हणून नाराज असेलल्या कार्यकर्त्यांची समज काढणार आहे. पक्षाचा निर्णय मला मान्य आहे, शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट करत नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

सभासदांचा ऊस राहणार नाही : बजरंग सोनवणे
जिल्ह्यात ऊसाचा प्रश्न गंभीर आहे. ऊसाचे गाळप पूर्णपणे होईल की नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे. हा प्रश्न आपण यापूर्वी अनेकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडलेला आहे. सभासदांचा ऊस गाळपाशिवाय राहणार नाही असा प्रयत्न आहे.

Tagged