कार झाडावर आदळली; मंडळाधिकारी जाधव यांचा मृत्यू तर तहसीलदार जखमी

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड


गेवराई दि.6 : अवैध वाळू वाहतूक विरोधात कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील अधिकाऱ्यांच्या कारचा अपघात झाला. यामध्ये मंडळ अधिकारी नितीन जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर बीडचे प्रभारी तहसीलदार सुरेंद्र डोके हे जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि.6) पहाटेच्या सुमारास राक्षसभूवन रोडवरील सावळेश्वर फाटा येथे घडला.


महसूल विभागाचे पथक अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात गोदापात्रात कारवाईसाठी गेले होते. यावेळी गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर फाटा येथे रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांची कार (एमएच-23 एडी-4435) एका झाडावर आदळली. या अपघातात मंडळ अधिकारी तथा महसूल कर्मचारी संघटनेचे सचिव नितीन जाधव यांचा मृत्यू झाला. तर बीडचे प्रभारी तहसीलदार सुरेंद्र डोके हे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात कसा झाला याचा तपास गेवराई पोलीस करत आहेत.

Tagged