‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यास विरोध

अंबाजोगाई न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

अंबाजोगाईत हिंदु जनजागृती समितीची तक्रार

अंबाजोगाई : ‘व्हॅलेंटाईन डे’ 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवसाला साजरा करण्यास अंबाजोगाईतून हिंदु जनजागृती समितीने विरोध दर्शविला. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्यावतीने अंबाजोगाई तालुका प्रशासनाकडे शनिवारी (दि.12) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत 14 फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे. पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करत हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच, यादिवशी होणार्‍या पार्ट्यांमधून युवक-युवती यांच्यात मद्यपान, धूम्रपान, अंमली पदार्थांचे सेवन आदी अपप्रकारांत प्रचंड वाढ झाली आहे. या दिवशी मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी भरधाव वेगाने वाहने चालवल्याने अपघातही होतात, तसेच काही धर्मांध युवक हे युवतींना खोटी नावे सांगून त्यांना ‘लव्ह जिहाद’चा बळी बनवतात. तरी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन हिंदु जनगजागृती समितीच्यावतीने नायब तहसीलदार स्मिता बाहेती, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील लिपीक श्रीमती बनसोडे यांना निवेदन देण्यात आले. तसेच, येथील 2 शाळा आणि 7 महाविद्यालयातही निवेदन देण्यात आले. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे नवनाथ अप्रुपल्ले, बालाजी भारजकर, आकाश चौरे, अधिवक्ता अशोक मुंडे, मंगेश बारस्कर, सीमा पाटील, रक्षंदा बलुतकर, शोभा चौधरी, सुनिता पंचाक्षरी, लता जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ADVT

मार्गदर्शक सूचना जारी करण्याची मागणी
14 फेब्रुवारी या दिवशी पोलिसांची विशेष पथके-गस्ती पथके नियुक्त करून महाविद्यालय परिसरात अपप्रकार करणार्‍या समाजकंटकांना ताब्यात घेणे. वेगाने वाहने चालवणार्‍यांवर कारवाई करणे आदी उपाययोजना कराव्यात. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने महिलांवर होणार्‍या अत्याचारांचे प्रमाण पाहता शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी ‘मार्गदर्शक सूचना’ निर्देशित करण्यात याव्यात.

Tagged