indian cash

कर्ज घ्यायलाच कोणी नाही

देश विदेश न्यूज ऑफ द डे

बँकांसमोर पेच

नवी दिल्ली, दि.30 : लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग व्यवहार ठप्प आहेत. लघू व मोठ्या उद्योजकांना उद्योगात कुठूनच आशावाद दिसत नाही. परिणामी लघू आणि दिर्घ मुदतीच्या कर्ज मागणीत घट झालेली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती पुढील आठवड्यात योग्य तो निर्णय घेईल, अशी अपेक्षा असोचेम या उद्योजकांच्या संघटनेने व्यक्त केली आहे.
6 ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. या अनुषंगाने या संघटनेने म्हटले आहे की, उद्योगांच्या ताळेबंदातील कर्ज वाढले आहे. भविष्यात मागणी निश्चित नसल्यामुळे उत्पादन क्षमता वाढविता येत नाही. त्यामुळे उद्योगांकडून कर्ज घेतले जात आहे. रिझर्व्ह बँकेने भांडवल सुलभता निर्माण केली आहे, हे खरे आहे. मात्र, बँका त्यांच्याकडील पैसे रिझर्व्ह बँकेत रिव्हर्स रेपो दराने ठेवीत आहेत. बँकांकडून आलेले पैसे रिझर्व्ह बँक केंद्र सरकारचे कर्जरोखे खरेदी करण्यासाठी वापरत आहे.
त्यामुळे उद्योग विश्वावरील परिस्थिती बदललेली नाही. उद्योगांनी घेतलेल्या कर्जामध्ये 1.5 टक्क्यांची घट झाली आहे. खत क्षेत्राने घेतलेल्या कर्जात 29 टक्के, रसायन क्षेत्राने घेतलेल्या कर्जात 10 टक्के, काच उद्योगाने घेतलेल्या क्षेत्रात 7 टक्के घट झाली. बांधकाम क्षेत्राने घेतलेल्या कर्जात 3.7 टक्के, दागिने उद्योगाने घेतलेल्या कर्जात 3.7 टक्के तर कातडी उद्योगाने घेतलेल्या कर्जात 4.4 टक्क्यांची घट झाली आहे.
सध्या देशातील उद्योग त्यांच्या क्षमतेच्या पन्नास टक्क्यांवर चालत आहेत. अशा परिस्थितीमध्ये कर्ज घेऊन उद्योगाचा विस्तार करण्याची कल्पनाही उद्योगांच्या मनात येत नाही. असोचेमचे महासंचालक दीपक सूद म्हणाले की, सध्या रिझर्व्ह बँकेकडून बँका रेपो दराने कर्ज घेत नाहीत. त्याऐवजी रिव्हर्स रेपो दराने बँका आणि वित्तीय संस्था रिझर्व्ह बँकेकडे पैसे ठेवीत आहेत. रिझर्व्ह बँकेने निर्माण केलेल्या भांडवल सुलभतेचा फक्त सरकारला कर्ज घेण्यासाठी उपयोग होत आहे. बाकी उद्योग क्षेत्रांत सगळीकडे ठणठणाट आहे, असे सूद यांनी सांगितले.

कर्ज फेररचनेला पर्याय नाही

सध्याच्या परिस्थितीत कर्जाच्या फेररचनेला पर्याय नाही. पतधोरण समिती याबाबत निर्णय घेईल, अशी आशा सूद यांनी व्यक्त केली. क्रेडिट कार्डधारकांकडून येणे असलेली रक्कम 14 टक्क्यांनी कमी झाली आहे. ठेवीपोटी घेतलेल्या कर्जाची रक्कम 20 टक्क्यांनी कमी झाली तर शेअर व रोखे तारणांवर घेतलेली कर्जाची रक्कम 15 टक्क्यांनी कमी झाली आहे. यावरून सगळीकडे किती निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे, याचा अंदाज येईल.

Tagged