एलसीबीचा फक्त प्रधान बदलतो; पण प्याद्या त्याच!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

15 वर्षापासून गोचिडासारखे चिकटून बसलेले कर्मचारी कधी बदलणार?

बीड, दि.30 : येथील स्थानिक गुन्हे शाखेत मागील पंधरा वर्षापासून अनेक कर्मचारी माया कमविण्यासाठी दबा धरुन बसले आहेत. दर दोन-तीन वर्षाला येथील प्रधान बदलला जातो पण प्यांद्या मात्र त्याच ठिकाणी गोचिडासारख्या चिकटून बसलेल्या असतात. सध्या एलसीबीत ‘तपास कमी अन् वसुली जादा’ असा कारभार सुरु आहे. अनेक वर्षापासून एलसीबीला चिटकून बसलेल्या पोलीस कर्मचार्‍यांची चौकशी करावी. व पोलीस दलातील कुशल, होतकरु, गुन्हेगारांची माहिती असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी अशी मागणी एका वरीष्ठ होत आहे.

साम, दाम, दंड व राजकीय वरदहस्ताच्या जोरावर अनेक वर्षापासून काही पोलीस कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेमध्ये चिटकून बसले आहेत. एलसीबीमधील ब्रॅन्च बदलून मागील दहा ते पंधरा वर्षापासून एकाच ठिकाणी आहेत. त्यामुळे अवैध गुटखा, वाळू, मटका, जुगार अशा धंदेवाल्यांसोबत त्यांचे घनिष्ठ संबध झालेले आहेत. त्यामुळे छापा टाकण्यापूर्वीच अवैध धंदेचालकांना यांच्याकडून माहिती पुरवली जाते. त्यामुळे अवैध धंदे सुरु असूनही कारवाई होत नाही. त्यामुळे मागील दहा ते पंधरा वर्षापासून चिकटून बसलेल्या कर्मचार्‍यांना इतरत्र हलवून त्यांच्या जागी गुन्हेगारांची माहिती असलेले, कुशल, होतकरुन कर्मचार्‍यांना काम करण्याची संधी दिली पाहिजे. यामुळे नवीन कर्मचार्‍यांना काम करण्याची संधी मिळेल आणि अवैध धंदेही बंद करण्यास मदत होईल. याकडे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

मॅनेज नको, मेरीटवाला पाहिजे
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा प्रमुख निवडताना मॅनेज होणारा नाही तर मेरीटवाला अधिकारी देणार असल्याचे सांगितले होते. फक्त अधिकारी मेरीटवाला देवून फायदा नाही. अधिकार्‍या सोबतची टिमही मेरीटवाली पाहिजे. मात्र सध्या एलसीबीमध्ये मेरीटवाले कितीजण आहेत हे नुकत्याच व्हायरल झालेल्या क्लिपवरुन लक्षात येतच आहे.

अंतर्गत राजकारणही वाढले
स्थानिक गुन्हे शाखेत अनेक वर्षापासून असलेल्या कर्मचार्‍यांमुळे मोठ्या प्रमाणात अंतर्गत राजकारण वाढले आहे. काही नवे काही जुने असे गट तयार झाले आहेत. त्यामुळे तपास कामाकडे दुर्लक्ष होत असून आरोपीच्या बाबतीत जवळचा-लांबचा, त्यांचा-आमचा असाही भेदभाव केला जात आहे. जुने खोड नव्यांना काम करताना अडचणी निर्माण करतात, तपासकामात अडचणी आणतात, असा सूर येथील त्रासलेल्या कर्मचार्‍यांमध्ये आहे.

पुर्ण सर्व्हीसच एलसीबीत करणार आहेत का?
स्थानिक गुन्हे शाखेत काही कर्मचारी असे आहेत की, त्यांची स्थानिक गुन्हे शाखेतील नेमणूक होऊन पंधरा ते वीस वर्ष झाले आहेत. त्यामुळे राहिलेली सर्व्हीसही स्थानिक गुन्हे शाखेतच पुर्ण करणार आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एका पोलीस कर्मचार्‍याची निनावी तक्रार
एका वरीष्ठ पोलीस निरीक्षकाने एलसीबीतील अनागोंदीविषयी राज्याचे पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांच्याकडे निनावी तक्रार केली आहे. त्यात स्थानिक गुन्हे शाखेत वर्षानुवर्षे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सलीम, क्षीरसागर, सानप, औताडे, गोले, दराडे, केंद्रे, जगताप, ठाकूर, यादव, प्रदीप सुरवसे, बांगर यांची नावे नमूद केली आहेत. शिवाय अन्य एका वरीष्ठ पोलीस निरीक्षकाने एलसीबी प्रमुख भरतकुमार राऊत यांचीही तक्रार केली आहे. त्यांना नियमबाह्यपणे पोस्टींग दिल्याचे निनावी तक्रारीत म्हटले आहे.

Tagged