गेवराई तालुक्यातील हृदयद्रावक घटना
गेवराई, दि.6 : नदीकाठी खेळायला गेलेल्या चार मुलांचा वाळू उपशामुळे तयार झालेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली. दरम्यान दोनच दिवसापुर्वी राजेंद्र शिंदे या मजुराचा केणी डोक्याला लागून राक्षसभुवन येथे मृत्यू झाला होता.ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा दुसरी घटना घडली. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून वाळू माफियांविरोधात प्रचंड असंतोष तयार झाला आहे.
गेवराई तालुक्यातील मादलमोही जिल्हा परिषद गटातील शहजानपूर चकला येथील बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर या नऊ ते बारा वर्षे वयोगटातील मुलांचा यात बुडून दुर्दैवी अंत झाला.
गेवराई तालुक्यातील सिंदफणा नदीपात्रात जेसीबीच्या साह्याने रात्रंदिवस अवैध वाळू उपसा सुरु असतो. त्यामुळे नदीपात्रात मोठमोठाले खड्डे तयार झाले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा तहसीलदारांना निवेदन देऊन अवैध वाळू उपशांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र महसूल प्रशासनाकडून याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे आता ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. जोपर्यंत वाळू माफियांवर गुन्हे नोंद केले जात नाहीत तोपर्यंत या चारही मुलांचे मृतदेह येथून हलवणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. यापुर्वी गेवराई तालुक्यातील अनेक जणांना वाळु माफीयांमुळे आपला जीव गमवावा लागलेला आहे. अनेकजण वाळूच्या टिप्परखाली चिरडले गेले आहेत. त्यामुळे आता ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झालेले असून तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती आहे.