mushakraj bhag 1

प्रस्थान…

न्यूज ऑफ द डे संपादकीय

मुषकराज भाग 1
(श्रावण संपला आणि आता भाद्रपद सुरु झाला. बाप्पा आपल्याच तंद्रीत पृथ्वीतलाकडे निघण्याची घाईत असल्याचे मुषकाने हेरले. संदकात ठेवलेल्या एक एक वस्तु बाप्पा पुन्हा पुन्हा काढून न्याहाळून पुन्हा पुन्हा आत ठेवत होते. बराच वेळ त्यांचा हा चाललेला कार्यक्रम मुषकराज शांतपणे पहात होते. न राहवून मुषकाने एकदा आपल्या शेपटीला जमीनीवर आपटून दोन्ही पाय मागे घेत टूणकन् संदकावर उडी घेतली. मुषकाच्या उडीने बाप्पांची तंद्री भंग झाली. बाप्पा काही बोलण्याच्या आतच मुषक बोलायला लागले… )
मुषक : आता आणिक ह्या सगळ्या वस्तु संदकात ठेऊन माझा जीवबीव घेता का काय? तुमचं काय जातंय? उचलायचंय मला..! पृथ्वी तलावर गेल्यावर गणपतीचा सेट द्या म्हणलं की एका झटक्यात सगळंच मिळतं. मग हे वझं इथून कशाला घ्येताव..?  
बाप्पा : तसं नाही मुषका… ह्यावेळी मी सगळं इथंच ठेवणारंय. फक्त ऐवढा नकाशा हातात घेतोय… पहिल्यांदा कुठं उतरायचं ते कळायला नकोय?
मुषक : तुम्ही त्याची काळजीच सोडा… ह्या पठ्ठ्याने सगळा प्लॅन ‘अप टू डेट’ करून ठीवलाय… कुठं उतरायचं? कुणाकडे जेवायचं? मुक्कामाची सोय? खाली गेल्यावर कुठली प्रकरणं हातावर घ्यायची? सगळं मट्रेल तयारंय… तुम्ही फक्त पाटकुळीवर बसण्याचा औदी…
बाप्पा : पहिल्यांदा कुठं जायचंय सांग जरा मला…


मुषक : घ्या इकडं त्यो नकाशा… इथं जवळ या जरा अलिकडं… आधी मास्क लावा तोंडाला आणि जराऽऽ सरकून बसा… ह्यो भाग दिस्तोय का? ह्या इथं पहिल्यांदा जायचं ठरवलंय मी…
बाप्पा : बीडच्या खालतं दिसतंय हे सगळं…
मुषक : राईट वळखलं बगा… सध्या इथूनच सुरुवात करू… इथलंच सामाजिक न्यायाचं भलं मोठं प्रकरण तुम्हालाच निस्तरायला जायचंय… त्यांची सगळी फाईल आपल्याकडे रेडी झालीये…
बाप्पा : चला मग आता मी निश्चिंत झालोय…
मुषक : हो पण इतकंही निश्चिंत होऊ नका… नाय तर आपल्याला परळी ऐवजी ‘वरळी’ला जाऊन बसायची येळ येईन. अख्खा लॉकडाऊन तिथंच काढलाय काही लोकांनी…
बाप्पा : आपलं काय परळी असो की वरळी जनता जनार्धन आपल्या पाठी हायनं… आपुन कुठंका असनात ती आपल्या दर्शनाला यायला तयार असतेनवं… मग झालं…


मुषक : ह्या भ्रमात राहू नका मालक… ती परळीची जनताय… ती कुणाला उतू देत नाही अन् मातू पण देत नाय… ती लै वरती नेऊन घालतीया अन् तितक्याच लौकर खाली पण आपटतीया… 2019 चं इलेक्शन येतंय का ध्यानात… जनता इधानसभेला एकासंग अस्तीया अन् स्थानिक स्वराज्यला दुसर्‍याच संगं अस्तीया… अंबाजोगाईच्या त्या ‘थापा गोदी’सारखंच असतं त्यांचं बी…
बाप्पा : बरं तू लगेच आता अंबाजोगाईकडं घुसू नकू… उद्या आपलं लॅन्डींग कुठं व्हईल तेवढं सांग…
मुषक : बाप्पा काळजीच करू नका… आपल्या लॅन्डींगचं ठिकाण पण ठरलंय… त्ये आठवतंय का त्या ‘केक’चा धिंगाणा… सगळी परळीच कशी त्या केकवर तुटून पडली व्हती तवा… त्या ‘सपना’चे ठुमके… तिथंच तर त्या दाढीवाल्यानं मतं द्या म्हणून जोगवा मागीतला व्हता. नाहीच कळलं का..? आवो तवा नाय का अपून एकदा ढगातून जात व्हतो अन् खालून पायाला आपल्या काहीतरी टोचलं… मी खाली बगीतलं तर दिसलं खाली त्या मोठ्या सायबाचं भलं मोठं कटआऊट लावलेले व्हतं.. ते हेच ठिकाणंय… कळलं का नाही अजून?
बाप्पा : (कळून न कळल्यासारखं) माझ्या काही लक्षातंच येत नाई बग अजून…


मुषक : अरे देवाऽऽऽ बुध्दीची देवता… तुमचं बी चूक नाई मना… चांगल्या चांगल्या आफीसर लोकांचं पण तिथं गेल्यावर तसंच व्हतंया… त्याला तुमी काय करणार? जाऊ द्या… नाय समजूद्या उद्या उतरल्यावर कळलंच की…
बाप्पा : परमिशन… बिरमिशन काढून ठेव बाबा… ऐन वक्ताला पंचाईत नको…
मुषक : तुम्ही चिंता सोडा हो… तिथं बी आपला एक खास माणूस बसलाय… तुमच्या डॅडीचा बी तो लै फॅन… त्यांचं दर्शन घेतल्याबगर कुठल्या कामाला त्यो हात लावणार नाय… त्या माणसानं नुस्ता फोन फिरवीला तरीबी अख्खं पोलीस दल भिंगरी सारखं इकून तिकडं अन्  तिकून इकडं सारखं पळतंय… आणि त्येची खासियत सांगतो… कवा बी जा एनी टाईम त्यो त्याच जागेवर बसलेला दिसंल तुमाला… आवो त्येवच ‘चालकमंत्री’ म्हणलं तरी काय फरक नाय पडणार बगा… इतका त्याचा वट… पण गडी मालकाशी लै परमाणिक, ‘एक दिल दो जान’ सारखं… येळ आली की कुणाचाबी करेक्ट कार्यक्रम लावण्यात ह्या गड्याचा हात दुसरा कुणीच नाही धरणार…  
बाप्पा : असं म्हणतूस…? मग चल बरं निघू लगेच…
(असं म्हणून मुषकाने बाप्पाला आपल्या पाठीवर बसवलं आणि त्यांनी बीड जिल्ह्यात प्रवेश केला.)

बालाजी मारगुडे
कार्यकारी संपादक, दैनिक कार्यारंभ
मो.9404350898
दि. 10 सप्टेंबर 2021

Tagged