वीरशैवांचा आधारवड कोसळला; माजलगावकर महाराज शिवचरणी लीन

न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

चंद्रशेखर शिवाचार्य नूतन मठाधिपती

माजलगाव : येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती सद्गुरू श्री. तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे आज (दि.10) दुपारी 1 वाजता वृध्दपकाळाने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. गेल्या एक महिन्यापासून श्री माजलगांवकर महाराज शारीरिक व्याधीग्रस्त होते. मात्र गेल्या आठ दिवसात त्यांची प्रकृती अधिकच खालावली. दरम्यान शुक्रवारी दुपारी 1 वाजता त्यांनी माजलगांव येथील मठात अखेरचा श्वास घेतला. माजलगांवकर महाराजांच्या जाण्याने देशातील सम्रगी वीरशैव समाज शोकसारात बुडाला असून वीरशैवांचा आधारवड कोसळला असल्याची प्रितिक्रिया हिमवत्केदार महापीठाचे जगद्गुरू श्री.श्री.श्री. 1008 भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजींनी आपली शोकसंदेशात व्यक्त केली.

माजलगांवकर महाराजाचे निधन झाले. त्यावेळी जगद्गुरू माजलगांव मठातच उपस्थित होते. महाराजांच्या प्रकृतीची चौकशी करण्याच्या निमित्ताने ते गुरूवार सायंकाळीच माजलगावात आले होते. यावेळी श्रीगुरू देवांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर, श्रीगुरू सिध्दलिंग शिवाचार्य महाराज शिखर शिंगणापूरकर, अंबाजोगाईचे श्रीगुरू शंभुलिंग शिवाचार्य महाराज, पाथ्रीच्या कांचबसवेश्वर मठाचे श्रीगुरू काशीनाथ शिवाचार्य महाराज, पूर्णा येथील श्री गुरू डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, माळकवठा येथील श्रीगुरू पंचाक्षरी शिवाचार्य महाराज यांच्यासह हजारो समाज बांधव उपस्थित होते. दरम्यान माजलगांवकर महाराजांच्या पार्थीवावर उद्या (दि.11) सकाळी 11 वाजता मठाच्या आवारातच समाधीविधी करण्यात येणार आहे. गेल्या सहासात दशकात देशातील वीरशैव समाजाच्या झालेल्या जडण घडणीत सिंहाचा वाटा उचलणार्‍या माजलगांवकर महाराजांनी वीरशैव समाजाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. दि.2 डिसेंबर 1927 साली गुलबर्गा जिल्ह्यातील परुताबाद येथे संगम्मा व श्री शिवलिंगय्या हिरेमठ स्वामी यांच्या उुरी त्यांचा जन्म झाला. परुताबाद, सोलापूर येथे आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1954 साली माजलगांव मठाची सूत्रे त्यांनी स्वीकारली. मठाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या सात दशकामध्ये महाराजांनी माजलगांव मठासह समग्र वीरशैव समाजाला मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. औरंगाबाद, बीड, कपिलधार, बार्शी, गेवराई आदी ठिकाणी माजलगांव मठाचा विस्तार करून या मठाला धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात सर्वोच्च स्थानी नेण्याची त्यांची कामगिरी नेत्रदिपक आहे. सिध्दयोगी तपस्वी म्हणून सर्व जाती धर्मात लोकप्रिय ठरलेल्या माजलगांवकर महाराजांना त्यांचे तपःसामर्थ्य पाहून रंभापुरी महापीठाचे तत्कालीन जगदगुरू श्री वीरगंगाधार शिवाचार्य भगवत्पाद यांनी तपोरत्नं या उपधीने गौरविले. त्याच प्रमाणे वीरशैवांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र कपिलधारच्या विकासातील त्यांचे अतुल्य योगदान लक्षात घेवून विद्यमान काशी जगदगुरू डॉ.श्री. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी श्री क्षेत्र उद्धारक श्री प्रभू या उपाधीने सन्मानित केले आहे.

चंद्रशेखर शिवाचार्य नूतन मठाधिकारी
वयाच्या शंभरीकडे वाटचाल करणारे माजलगांवकर महाराज यांची गेल्या आठ दिवासात प्रकृती अधिकच चिंताजनक बनली होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी श्री केदार जगदगुरू गुरुवारी (दि.9) माजलगांव येथे आले असता एकुण स्थिती लक्षात घेवून माजलगाव मठाच्या उत्तराधिकार्‍याचा पट्टाभिषेक करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. लागलीच शुक्रवारी सकाळी 11 यांच्या उपस्थितीत माजलगाव मठाचे उतराधिकारी श्री चंद्रशेखर स्वामी यांचा पट्टाभिषेक केला. मठाच्या परंपरेनुसार त्यांचे नामकरण श्री.ष.ब्र.108 चंद्रशेखर गुरु प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज असे करण्यात आले.

Tagged