mushakraj

मुषकराज भाग- 2 फैसला ऑन दी स्पॉट…

न्यूज ऑफ द डे राजकारण संपादकीय

फैसला ऑन दी स्पॉट…
(बाप्पाचं हेलीकॅप्टर साक्षात वैद्यनाथाच्या नगरीत त्या भल्या मोठ्या मैदानावर लॅन्ड झालेलं होतं. हेलीकॉप्टरचं पातं थांबण्यापुर्वीच मुषकानं टूणकन् बाहेर उडी मारली. मातीत तोंड खूपसून तलवारीला धार लावावी तसं मुषकाने एका दगडावर दाताला धार लावल्यासारखं केलं. इकडे बाप्पा ह्याच्या करामती नजरेनेच टिपत थोडसं गालातल्या गालात हसले. बाप्पा हेलीकॉप्टरच्या खाली उतरले आणि आपल्या डॅडीच्या भुमीत आलोय म्हणत वैद्यनाथाच्या मंदिराकडे तोंड करून दोन्ही कर जोडत त्यांना नमस्कार केला…)
बाप्पा : (सगळं कळून न कळल्यासारखं) चल रे चल बस झालं… नीट बघ नकाशाप्रमाणे आपलं हेलीकॉप्टर लॅन्ड झालंय का नाई ते…
मुषक : बाप्पा आपून चुकत कधीच नाय बगा… आपण बी सगळं काम कसं एकदम राईट करून टाकतो.
बाप्पा : आपण राईट आलो तर मग आपल्या स्वागताला कुणीच कसं आलं नाही. नेमकं झालंय काय इथल्या प्रजेला…
(बाप्पाचा लालबूंद झालेला चेहरा पाहून मुषकाचे हातपाय लटलटू लागले. सगळा धीर एकवटून मुषक बोलायला लागले)
मुषक : म्हणून तर तुम्हाला इथंच आणलंय… बगायला नकू का इथल्या जनतेचे हाल… सत्ताधारी कसे वागायलेत… विरोधक काय करायलेत… तुम्ही आपलं मोदक खाऊन ढाराढूर…
(इतक्यात भरधाव वेगात एक टिप्पर येतं, एका गतिरोधकावर ते आदळतं. त्यातून उडालेली राख मुषकाच्या डोळ्यात जाते. मुषक डोळे चोळत चोळत बोलणं सुरूच ठेवतो) हे असंय बघा इथं… काही दाखवायला जावा तर लगेच इथं डोळ्यात धूळ जाते.
बाप्पा : मला काहीतरी संशयच येतोय… धूळ अशी तशी उगच जात नाही डोळ्यात… चल बरं कोणंय इथला प्रमुख त्यालाच भेटू आणि पटापट आपल्या कामाला सुरुवात करू…
मुषक : त्यो समोर ‘लाल किल्ला’ दिस्तोय का तुम्हाला..? तिथंच जायचंय आपल्याला… इथूनच सगळी सूत्रं हलतात. इथला मेन माणूस इथं जास्ती रहात नसला तरी त्यांचे प्रधानसेवक इथेच असतात आणि तेच बघतात सगळं…
(दोघेही ‘त्या’ लाल किल्ल्यावर पोहोचतात. तर तिथे भला मोठा दरबार भरलेला असतो. दरबाराच्या समोर एक धिप्पाड शरीरयष्टी, थोडीशी दाढी वाढवलेला माणूस समोरच एका खुर्चीवर पाय दुमडून बसलेला असतो. ते कोण असे बाप्पाने मुषकाला विचारले तर मुषकाने त्यांचं नाव बाल्मिकअण्णा असल्याचं सांगितले.)
बाल्मीकआण्णा : एैऽऽ गणेशऽऽ कोणंय रे तिकडं? लाव बरं एसपींना फोन… ह्यांची गाडी पकडलीयं म्हणं (फोन लावला जातो आणि बाल्मीकअण्णा फोनवरच बोलायला लागतात.) हॅलोऽऽ एवढा मोठ्ठा हार आल्या आल्या तुमच्या गळ्यात घातला त्यो उगीचंय व्हंय..? आमच्या कार्यकर्त्यांनी राख उचलून नेली म्हणून काय झालं? मग काय तशीच उडू द्यायची का ती राख? इथं रोजच लोकांच्या भाकरीत राख मिसळायलीय… जमीन पडक पडलीय… ती उचलून उचलून संपून टाकावी लागणारंय ना… थोडी डोळ्यात गेली म्हणून काय झालं… आमीबी जनतेसाठीच बसलोय न… ते काय माहित नाई… राख उचलणारचं… बाकी कसं काय करायचं ते तुम्ही बगा… ठूतो फोन…
एक माणूस : आण्णा आपलं तेवढं टेंडरचं बगा… त्या दुसर्‍यानं पण तिथं टेंडर भरलंय…
बाल्मीकआण्णा : एैऽऽ गणेशऽऽ लाव त्या एक्सिकेटीव्ह इंजिनीअरला फोन
(फोन लागतो अन् आण्णा बोलायला लागतात.) काय साहेब आम्हाला निवडणुकीला पाडायचं ठरवलंय का तुमी… मग ह्यो कार्यकर्ता इथवर कसा आला? ते काय नाय… कोण त्यो टेंडर भरणारा त्याला उचलून आणा माझ्याकडं… कसा वापस घेत नाय ते बगतो… अन् तुमाला जमत नसंल तर मला सांगा… इथं माझ्या कार्यकर्त्याला कामं मिळत नसतील तर काय उपेगंय आमचा..?
दुसरा माणूस : आण्णा त्या झाडं जगवा झाडं लावावाल्यांनी लैच अडवून धरलंय माझं काम
बाल्मीकआण्णा : एैऽऽ गणेशऽऽ लाव त्या दहापुत्याला फोन…
(फोन लागतो आण्णा बोलायला सुरु करतात.) काय रे एै कुऽऽऽऽ लै माजला का रेऽऽऽ तुला एकदा सांगून बी जमना का..? …आता जर दुसर्‍यांदा हा माणूस माझ्याकडं आला तर माझ्याशीच तुझी गाठंय लक्षात ठेव… अन् तुह्यानं व्हत नसंल तर बदली करून घी…
तिसरा माणूस : आण्णा माझी गाडीच कुणीतरी चोरून नेली…
बाल्मीकअण्णा : एैऽऽ गणेश मधले लाख रुपये आण… अन् लाव त्या शोरूम वाल्याला फोन…
(फोन लागतो आण्णा बोलायला लागतात) हे बघ माझ्या कार्यकर्त्याला पाठवतोय अन् मी पण लगेच येतोय… त्याला एक नवी गाडी देऊन टाक… (फोन ठेवला जातो) जाऊदे जुनी गेली तर गेली… साडेसाडी गेली बग तुझ्या मागची… हे घे पैसे अन् जा तिथून नवी गाडी घे… मी असताना कसली चिंता…
(आता चौथा माणूस आण्णांना बोलत असतो. पोलीस असावा बहुतेक) बाल्मीक आण्णा ः कावून येवढे चिंताग्रस्त झालेऽऽऽ मोदीच्या बंदोबस्ताचा खर्चय का… कितीय..? एैऽऽ गणेशऽऽऽ ती मधील बॅग घी…
(गणेश बॅग घेऊन धावत पळत येतो अन् आण्णाच्या हाती बॅग ठेवतो) आहो भाजपाची सभा असली मनून काय झालं… तुम्ही तर आमच्येत ना… हे धरा आणि जा… देऊन टाका ज्याचा त्याचा खर्च… तुमच्या चेहर्‍यावर टेन्शन नकू… आणि मी असल्यावर तर नकूच नकू…
(बराच वेळ अशाच कामाची माणसं येऊन भेटत होती. प्रत्येकाचा फैसला ‘ऑन दी स्पॉट’ होत होता. हे पाहून मुषकानं बाप्पाला सांगितलं. आपण दारात कितीवेळ थांबायचं..? दिवस निघल्यापासून लोक येतेत जातेत रात्रीचे दहा वाजले तरी हेच चालू असतं इथं… तवा आपून आल्याचा त्यांना निरोप देऊ… म्हणजे आपण पुढे निघायला मोकळे…)
टीप- ‘मुषकराज’ हे सदर केवळ मनोरंजनात्मक हेतूने आहे. याचा कुठल्याही राजकीय, अराजकीय घटना, व्यक्तींशी संबंध नाही. आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा…
क्रमशः उर्वरित उद्याच्या अंकात…

बालाजी मारगुडे
कार्यकारी संपादक, दैनिक कार्यारंभ
मो.9404350898
दि. 11 सप्टेंबर 2021

मुषकराज भाग- 1 वाचण्यासाठी क्लिक करा…

Tagged