waze-ambani

सचिन वाझे प्रकरणात आता मसिर्डीज गाडीची एन्ट्री

देश विदेश न्यूज ऑफ द डे

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आधी स्कॉर्पिओ, नंतर इनोव्हा गाडीचा तपास एनआयएने केल्यानंतर आता आणखी एक मर्सिडीज गाडीची एन्ट्री झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयएला मर्सिडीज कारचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरील आहेत. या मर्सिडीजमध्ये मनसुख हिरन बसले होते, असं बोललं जात आहे. सीसीटीव्हीनुसार, मनसुख हिरन कोणाची तरी वाट पाहत होते. त्यानंतर काही वेळानंतर ही मर्सिडीज कार आली आणि त्यात बसून ते निघून गेले. एनआयएला संशय आहे की मनसुख हिरेन बेपत्ता होण्याच्या काही वेळ आगोदरचे हे सीसीटीव्ही फुटेज आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थाजवळ जिलेटीन कांड्या ठेवलेली एक स्कॉर्पिओ आढळून आली होती. या प्रकरणी सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर स्कॉर्पिओसोबतच एक इनोव्हा गाडीही असल्याचं समोर आलं होतं. स्कॉर्पिओ मनसुख हिरन यांची तर इनोव्हा सचिन वाझे कार्यरत असलेल्या शाखेची होती, असे तपासात सिध्द झाल्यानंतर काही दिवसात मनसुख हिरन यांचा संशयास्पदरित्या मुंबईच्या खाडीत मृतदेह आढळून आला. त्यानंतर प्रकरणाची गुंतागुंत वाढत गेली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणात तपास अधिकारी सचिन वाझे याचा हात असल्याचे आरोप केल्यानंतर प्रकरण वाढत गेले. शेवटी एनआयएने हा तपास आपल्या हातात घेतला.

वाझे राहत असलेल्या सोसायटीचे
फुटेज वाझेंनी घेतले ताब्यात

वाझे यांच्या ‘सीआययू’च्या पथकाने या प्रकरणात तपास सुरू केला. तपास हाती येताच 27 फेब्रुवारीला वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये हे पथक पोहोचले. तपासाच्या नावाखाली या सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवांच्या नावे अर्ज करून सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेजचे रेकॉर्डिंग करणारे दोन डीव्हीआर या पथकाने ताब्यात घेतले. स्फोटके ठेवणारे इनोव्हा कारमधून निघून गेले. मुलुंड टोल नाक्यावरून पुढे ही इनोव्हा कार नेमकी कुठे गेली हे समजले नाही. साकेत सोसायटीदेखील येथून जवळच असल्याने हे डीव्हीआर घेतले असावेत असे म्हटले जात असले तरी याच सोयायटीचे डीव्हीआर का घेतले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे संशयाला जागा निर्माण झाली असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.

स्फोटके ठेवण्यात आलेली स्कॉर्पिओ ही ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरन यांच्या मालकीची होती. मनसुख हे वाझे यांच्या परिचयाचे असून ही कार काही दिवस ते वापरत होते. स्फोटक प्रकरणात एकमेव दुवा असलेल्या मनसुख यांचा 5 मार्चला संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेनंतर तपास एटीएसकडे सोपवण्यात आला.

इनोव्हा कार वाझे यांच्या सीआययू पथकाची असल्याचे तपासात समोर आले. गाड्यांचे कनेक्शन तपासण्यासाठी वाझे यांच्या सोसायटीमधील सीसीटीव्ही फूटेज आवश्यक असताना त्यांचे डीव्हीआर आधीच कशासाठी जप्त करण्यात आले, याचा शोध घेण्यात येत आहे. सोसायटीबरोबरच मनसुख यांचे दुकान, नंबर प्लेट तयार करणारे यांच्या दुकानातील डीव्हीआरदेखील घेण्यात आले. एनआयएच्या तपासात वाझेंनी सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केल्याचं उघड झालं आहे. केवळ सीसीटीव्ही फुटेजच नव्हे तर सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे डिजीटल व्हिडीओ रेकॉर्डर नष्ट करण्याचा प्रयत्नही वाझेंनी केल्याचं उघड झालं आहे. हे सर्व डीव्हीआर वाझेंकडे होते आणि त्यातील अनेक डीव्हीर डॅमेज झालेले आहेत. तसेच वाझे बनावट नंबर प्लेट बनविणार्‍या दुकानात गेले होते. त्यांनीच स्कॉर्पिओ आणि इनोव्हा कारचे बोगस नंबर प्लेट तयार केले. स्कॉर्पिओला एका स्कूटरची नंबर प्लेट लावण्यात आली होती, असंही सूत्रांनी सांगितलं.

Tagged