(पराक्रमी हात बांधलेले पाहून बाप्पाने मुषकाला विचारले)
बाप्पा : काय रेऽऽ हे काय चाललेय राज्यात… शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कुठे गेलीये? लोकांचा विश्वास अशा पध्दतीने उडणे बरे नाही… जिल्ह्याच्या मातेची ही अवस्था तर लेकरांची काय झाली असेल?
मुषक : शांत व्हा बाप्पा तुम्ही आधी शांत व्हा… सगळं सांगतो… कुणाचे कुणी हात फित बांधले न्हाईत… सगळा नजरबंदीचा खेळ सुरुये… 2019 ला ह्यांना जनतेनं आपटल्यावर ह्यांचाच इथल्या लोकांवरचा विश्वास उडून गेलाय… ह्या सदा न कदा वरळीत बसून परळीची काळजी वहात असतील तर ह्यांना सगळं लख्खपणे कसं दिसल..? अहो कवाबी महत्वाचं काई असलं की त्या एकतर विदेशात अस्त्यात नायतर मध्यप्रदेशच्या दौर्यावर… ह्या जवा कवा परळीत येत्यात तवा त्यांच्या जवळच्या एका माणसांचा परळीच्या लाल किल्ल्यावरून ‘करेक्ट कार्यक्रम’ व्हतुया… नस्ती झंझट मागं नकू म्हणत आता तर आमी त्यांच्येयत असं म्हणणं पण कार्यकर्त्यांनी सोडून दिलंय… आता हेच बगा आपुन कवाच्यानी इकडं आलोत कोणी इच्यारलं का आपल्याला? आपल्याला इच्च्यारायला ह्याचे कोणी हात बांधलेत व्हंय… मी काय मणतो नसल तुमाला लौकर खाली येता येत तर निदान एखादं ते तसलं ट्विट का फ्विट करून तरी किमान स्वागत करायला काय जात व्हतं…
बाप्पा : आपुन आल्याची वर्दी त्यांना कोणी दिली नव्हती का?
मुषक : आपून लॅन्ड झाल्यापासून त्यांना ह्याची वर्दी हाय. पण पैल्यांदा तुमी तिकडं का गेले म्हणून पण खाली यायला त्यांना उशीर व्हत असणार… आणि वर निरोप घेऊन जायची इथल्या एकात पण टाप नाय… त्या नेहमी वर वरच असत्यात… अन् कार्यकर्ते खालीच लै मोठाल्या गप्पा हाणत्यात… त्यांचे पाय जमीनीवर असतील तर आपण त्यांना काही बोलू…
(तितक्यात कोणीतरी महिला फोनवर बोलत बोलतच पायर्या उतरत असल्याचा आवाज येतो. ऑफिसातल्या स्टाफची धावपळ सुरु होते. त्या इकडं तिकडं न बघताच थेट त्यांच्या केबीनला घुसतात. कोणीतरी बाहेर घोषणा देतो. “कोण आली रे कोण आलीऽऽ महाराष्ट्राची वाघीण आली…” कोणीतरी महिला मध्येच स्वतःच्या हाताने लिहीलेली कविता म्हणायला लागते… एकूणच त्या महिलेनं आपल्या कवितेतून जिल्ह्याच्या मातेला ‘संघर्ष कन्या’ उपमा देऊन टाकलेली असते.)
संघर्ष कन्या : कोण व्हीजीटर आलेत बाहेर..? एका एकाला द्या आत पाठवून…
(मध्येच एक विघ्नसंतोषी ‘राख’ नावाचा ढबराढुबरा माणूस आता जाऊन संघर्ष कन्येला पाणी दिल्याचं नाटक करतो. आणि तिसर्याच कोण्यातरी माणसाला आत नेऊन सोडतो… त्यानंतर पांढरे कपडे घातलेले असे बरेच जण आतमध्ये जातात येतात.)
मुषक : (तो सगळा प्रकार पाहून) हे इथं असंय बगा… साक्षात गणाधीश आले तरी ह्यांना कुणालाच त्याची फिकीर नाई… आवो तुम्ही आलाय हे सांगायला पण कुणी निरोप सुध्दा घेऊन जाणार न्हाई… आपून उजूक दुपारलोक इथं थांबलो तर “संघर्ष कन्या अंगार है, बाकी सब भंगार है” असलं काही ऐकायला मिळेल…
संघर्षकन्या : (फोनवर बोलत बोलतच बाहेर पडतात) असं कसं तुम्ही काय करत होते? कायदा सुव्यवस्था नावाचा काही प्रकार आहे की नाही? त्यांच्याकडे पिस्तूल सापडतं म्हणजे? पिस्तूल म्हणजे काय खेळणंय का? बाहेरून आलेली बाई पिस्तुल घेऊन येईलच कशाला? तिच्या नंदेचे हात बांधले नसते तर दाखवलं असतं एकाएकाला… त्यांच्यात ताकत आहे म्हणून अन्याय सहन करतोय असे नाही. पण लक्षात ठेवा… मी पण एक दिवस या राज्याची मुख्यमंत्री होणार आहे. आणि नाहीच झाले मुख्यमंत्री तर जनतेच्या मनातील मी एनीटाईम मुख्यमंत्रीये.. उगीच नाही लोक सकाळपासून माझ्या दारात गर्दी करीत… बसायला जागा नसते माझ्याकडे इतकी गर्दी रोजच असते… आजही मी ठरवलं सामाजिक न्यायाचं खातं कुणाला द्यायचं अन् कुणाला नाही… तर एका मिनिटात ते बदलण्याची ताकद माझ्यात आहे… एका बाईवर अन्याय होतोय म्हणजे, ते पण परळीत… राज्याची मान खाली गेलीये… आणि चाकू मारला चाकू मारला हे काय लावलंय..? चाकू आपल्या परळीला नवे आहेत का? आहो इथले लोक दातात काही अडकलं तर ते काढायला पण तलवार जवळ बाळगतेत… चाकूचं काय घेऊन बसले तुम्ही… (तेवढ्यात संघर्ष कन्येची नजर बाप्पांवर जाते. दुरूनच त्या बाप्पांना नमस्कार करतात. या दोघांचा संवाद सुरु होणार तेवढ्यात मध्येच मुषक बोलायला लागतो.)
मुषक : चालू द्या चालू द्या तुमचं… आमी काय प्रत्येकवर्षी येतोच… आधी तुमच्या थोरल्या घरी गेलो, तवा तुमचा हात बांधल्याचे समजले… त्यामुळे बाप्पा धावत पळत तुमच्या मदतीला आलेत…
संघर्षकन्या : मला कुणाच्याही मदतीची गरज नाही. मी स्वतः माझे हात सोडवणार… स्वाभीमानी लेक आहे मी…आणि मी असंही इथं कुणालाच नेता मानत नाही. मी राष्ट्रीय नेता आहे. आमच्या घरगुती मॅटरमध्ये कुणी पिस्तुल ठेवायचं काम नव्हतं… आमच्या काळात आम्ही कधीच अशी पिस्तुलं ठेवली नाहीत…
मुषक : (बाप्पांच्या कानात) आपण निघुयात… एकंदरीत तुम्हाला सगळा अंदाज आला असेलच. ह्यांच्या काळात पिस्तूल ठेवलीच नाहीत हे खरंय पण ती वापरली नाहीत याचा मात्र शोधच घ्यावा लागणारंय… ह्याचा काळ म्हणजे आजचा काळ नाही… मागील 30-40 वर्षापासून ह्यांचच या परळीवर राज्यंय…
(दोघे बराचवेळ बोलत असताना मध्येच कुणीतरी ‘अंगार-भंगार’च्या घोषणा द्यायला लागतं. बाप्पा आणि मुषक क्षणाचाही विलंब न लावता तिथून काढता पाय घेतात. दूर एका डोंगरावर दुरदर्शनच्या टॉवरजवळ बसून लाल किल्ल्यावरून दिलेले पार्सल उघडून मोदक खातात.)
क्रमशः- उर्वरित उद्याच्या अंकात…
बालाजी मारगुडे
कार्यकारी संपादक, दैनिक कार्यारंभ
मो.9404350898
टिप- मुषकराज हे सदर केवळ मनोरंजन हेतूने आहे. याचा कुठल्याही राजकीय, अराजकीय घटना, व्यक्तींशी संबंध नाही. लेखातील घटना, घडमोडीत साध्यर्म्य आढळल्यास केवळ तो योगायोग समजावा.
संपूर्ण मुषकराज वाचण्यासाठी क्लिक करा…
मुषकराज भाग 1 प्रस्थान
मुषकराज भाग 2 फैसला ऑन दी स्पॉट
मुषकराज भाग 3 मै जब जब बिखरा हॅूं…