MUSHAKRAJ

मुषकराज भाग 5 बेरकी माणूस…

न्यूज ऑफ द डे राजकारण संपादकीय

बेरकी माणूस…

(सकाळी तांबडं फुटायला बप्पा आणि मुषक अंबानगरीत पोहोचले. योगश्वरी देवीचं दर्शन घेऊन त्यांनी शहराचा कानोसा घ्यायला सुरुवात केली. जागोजागी गटारं तुंबलेली, शहरभर कचर्‍याचे ढिगारे, मच्छर चावल्याने तापीच्या रुग्णांनी दवाखाने फुल्ल झालेले. मुषकाने बाप्पांच्या पुढ्यात दाखल होत बाप्पांचं लक्ष एका होर्डिंगकडे वेधलं… त्यावर लिहीलेलं असतं अंबाजोगाई नगर परिषदेला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा सर्वोच्च पुरस्कार द्या…)

मुषक : बघा बघा… शहराची काय अवस्था करून ठेवलीये… नगर परिषदेने शहरात मच्छर पैदास केंद्रं सुरू केलीत की काय असं चित्र आहे. अहो ह्यांना नालीतील घाण देखील पुरत नाही ओ बाप्पा…

बाप्पा : मला इथल्या शहरप्रमुखाकडे घेऊन चल… इथं माणसं राहतात की कोंबड्यांचा खुरवडाय..? जिल्ह्याच्या विद्येचं माहेरघर म्हणतो ना आपण याला…

मुषक : मी घेऊन जातो बाप्पा… पण लक्षात ठेवा इथला गडी लै म्हंजी लै बेरकीय… तुमी कायबी इचारायला जावा घोगर्‍या आवाजातील त्याच्या ठोकर बातांमुळे असा गुळ पाडल की विचारायचीच सोय नाई… बघणाराला वाटतं काय सुशिक्षीत माणूस निवडून दिलाय अंबाजोगाईवाल्यांनी … पण कसला सुशिक्षीत अन् कसला काय त्याच्या संपर्कात आल्याबिगर कळत नाय… पण आता लोक थोडी हुश्यार झालीत… त्यांना कळाय लागलंय आपण निवडून दिलेला शहर विकासात सुशिक्षीत नाही तर भ्रष्टाचार करण्यात नंबर एकंय… इथल्या विकासाबद्दल 25 वर्षात जेवढं आपण ऐकलं ते नुस्तं थापा मारून ढापाढापी होती…

बाप्पा : म्हणजे काय म्हणायचंय काय तुला… मला ह्याच्या सगळ्या डिटेल्स हव्या आहेत… अन् त्यांना देखील वर्दी द्या… आम्ही आलोय… साक्षात गणाधिश… तुमच्या सगळ्या कारनाम्याचा पंचनामा करायला…

मुषक : त्यैची भेट घेण्याआगुदर आपुन नाट्यागृहात जाऊन येऊ… म्हंजी तुम्हास्नी ह्या बेरक्या माणसाचा खेळ कळून जाईल….
(दोघेही नाट्यगृहात जातात. आणि नाट्यागृह पाहून बोलतात)

बाप्पा : वा वा काय छान नाट्यगृहंय… ही तर अंबाजोगाईची शोभाय… इथल्या सांस्कृतिक चळवळीला अशा नाट्यगृहामुळे खरं तर बळ मिळतं…

मुषक : तुमचं खरंय बाप्पा… पण इथं सांस्कृतिक चळवळीला बळ मिळण्याऐवजी इथल्या नगर प्रमुखालाच लै बळ मिळालं बगा… नुस्तं गंडवलं लोकांना ह्यानं… ह्या खुर्च्या बगातय न… दुकानावर गेलं तर इथल्या एका खुर्चीची किंमत 4000 रुपये, इथं तर शेकडो खुर्च्या घेतल्या… एका खुर्चीवर 19 हजारांचा चुराडा केलाय… तरी बरं हीच खुर्ची 27 हजार रुपयाला घ्यायचा हैचा डाव व्हता… अहो दुर्वाची एक जोडी पाच रुपयांना म्हणलं तर लोक 17 ठिकाणी वाकडं होऊन खिशात हात घालू की नको असं करीत 1 रुपयांना मागतेत… पण इथं येवढा मोठा चुराडा केला तरी दोन चार नगरसेवकं सोडले तर कुणीच कसं काय बोलत नाय ह्याचीच लै कमालंय…

बाप्पा : हे तर अति झालं… जिथं अति असतं तिथं माती असते…

मुषक : तुम्ही बुध्दीची देवता… इथल्या लोकांना सदबुध्दी दिली तर यंदाच ह्यांची माती निश्चितंय…

बाप्पा : इथला खेळ माझ्या लक्षात आलाय… पण गडी माझ्याकडं आल्यावर लै धुतल्या तांदळासारखा वागतो… अजून मला ह्याचे दुसरे कारनामे दाखव…

मुषक : ही बगा तैच्या कारनाम्याची फाईल… गेल्या 20 वर्षात लोकांना थापा मारून त्यांनी 49 कोटी रुपये ढापलेत… हे आपण नाय तर लेखा परिक्षणात सांगितलंय… अन् ह्याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक ह्या ब्वाने इथं अफरा तफर केलीये… पण म्हणलं ना गडी लै गुळ पाड्या… ज्यैची राज्यात सत्ता त्यैच्या बाजुनी हा बाबा असतो. त्यामुळं प्रत्येकयेळी कुणी न कुणी ह्याला वाचवायला बगतो…

बाप्पा : अस्सं म्हणतोस… पण आता तर ह्याची फाईल माझ्या हातातंय

मुषक : (मोठ्याने हसत) त्यो तुमच्या पक्षात कवाशीक येईन हे तुमाला पण कळणार नाई. आता बी त्यो कुठल्या पक्षातंय हे जिल्ह्याला पण माहित नाई… कांग्रेसवाल्यानी त्यैचा गेम केल्यावर सध्या त्यांचं गुळपीठ राष्ट्रवादी बरूबर सुरुये… यंदा त्यो गडी तिथनं निवडणूक लढविण्याच्या इच्यारात हाय… कुठल्या नेत्याच्या सहवासात त्यो आला की त्या नेत्यावर कवानुक अंगारा भारून टाकीन कळंतय नाय… पण यंदा तसं होऊ देऊ नका बाप्पा… लोकांना सदबुध्दी द्या…

बाप्पा : जो माणूस विकास करतो त्याच्याच बाजुनं मी असतो. थापा मारणारे रानबोके मला कळत नाय असं वाटतं का तुला… चल आता नुस्त्या थापा मारणार्‍या इथल्या प्रमुखाला भेटण्याची देखील माझी मुळीच इच्छा नाही. चल पुढच्या प्रवासाला… आज पाचवा दिवस उजाडला तरी आपण परळी अन् अंबाजोगाईतच आहोत. अजून अख्खा जिल्हा आपल्याला फिरायचायं… लोक फोन करून विचारायला लागलेत आमच्याकडं कधी येताय म्हणून.. चल निघू पुढच्या तालुक्याला…

बालाजी मारगुडे
कार्यकारी संपादक, दैनिक कार्यारंभ
मो.9404350898
दि. 14 सप्टेंबर 2021

मुषकराज वाचण्यासाठी क्लिक करा…

मुषकराज भाग 1 प्रस्थान…

मुषकराज भाग 2 फैसला ऑन दी स्पॉट…


मुषकराज भाग 3 मै जब जब बिखरा हूँ…


मुषकराज भाग 4 संघर्ष कन्या…

Tagged