mushakraj-bhag-3

मुषकराज भाग 3 मै जब जब बिखरा हूँ…

न्यूज ऑफ द डे राजकारण संपादकीय

(दिवसभर उभं राहूनच बाप्पानी लाल किल्ल्यावरील दरबाराचं कामकाज बघीतलं होतं. आता मुषकाने पुढे जाऊन दरबार प्रमुख असलेल्या प्रधानसेवकाला बाप्पा आल्याची वर्दी दिली… तसे प्रधानसेवकांनी लगबगीने इर्मजन्सी बेल वाजवत साक्षात ‘बाप्पा आपल्या दारी’ आल्याची माहिती कार्यकर्त्यांना दिली. आणि स्वतः ताडकन् उठून मुख्य दरवाजाकडे धावत निघाले… जिथं कुठं कार्यकर्ते थांबलेले होते तेही एका क्षणात दरबारात हजर झाले. क्षणाचाही विलंब न लावणार्‍या प्रधानसेवकांचे कार्यकर्ते कामाला लागले. कुणी बाप्पांसाठी गालीछा अंथरला. कुणी हैद्राबादी ‘शेफ’ला मोदकांची ऑर्डर दिली. कुणी क्रेन आणलं, कुणी भलामोठा हार आणून क्रेनला लटकावला. बाप्पांनी पाठीमागे बघेस्तोवर शहरभर बाप्पांच्या आगमनाचे गगनचुंबी कटआऊटस देखील लागले. ढोल, ताशे आणि शे दिडशे गाड्यांचा ताफा… सोबतीला पोलीस बॅन्ड देखील तयार झाला होता. व्यापार्‍यांनी आप आपल्या दारात दुकानातील वस्तुंच्या कमानी तयार केल्या होत्या.)

बाल्मीकआण्णा : (धूप, दिप, भलंमोठं आरतीचं ताट घेऊन धावत पळत आले आणि म्हणू लागले) काय बाप्पा तुम्ही असं न सांगता येत असतात व्हंय… तुम्ही पहिल्यांदा या नाथाच्या नगरीतच येणार असा निरोप दिला असता तर स्वतः घ्यायला आलो नस्तो का? (दोघांचा बराच वेळ संवाद झाल्यानंतर बाप्पांची आरती झाली, त्यांना खास हैद्राबादी मोदक भरवण्यात आले. सोबत उकडीच्या मोदकाचं भलं मोठं पार्सल मुषकाच्या हाती सोपविण्यात आलं. उरलेले मोदक अख्ख्या परळीत वाटून जल्लोष करण्यात आला.)

बाप्पा : तुमचं काम बघून खूप आनंद झाला… पण इथले प्रधानमंत्री कुठंयत… त्यांना भेटायचंय…

मुषक : (बाप्पाच्या पुढ्यात येत बाल्मीक आण्णांकडे बोट करीत) बाप्पा इथले प्रधानसेवकच इथला सगळा कारभार बघतात. हे म्हंजी पावले तर भोळा शंकर अन् क्रोध झाला तर करेक्ट कार्यक्रम… इथल्या प्रजेसाठीपण हेच प्रधानमंत्री… हेच जिल्ह्याचे चालकमंत्री… आणि मोठ्याच प्रधानमंत्र्यांना भेटायचं अस्सल तर मग 11 दिवस आपल्याला इथंच रहावं लागल. सध्या त्यांची लैच फजिती सुरुये बगा… (मध्येच कुणाच्या तरी मोबाईलची रिंगटोन वाजते ‘तुम लाख कोशीश करलो मुझे बदनाम करने की… मै जब जब बिखरा हॅुं… दुगनी रफ्तारचे निखरा हूँ,’)

बाप्पा : (रिंगटोनकडे कटाक्ष टाकत) निरोप द्या त्यांना… सांगा आम्ही आलोय… साक्षात वैद्यनाथ पूत्र… गणाधिश… गजानन… विघ्नहर्ता

बाल्मीकआण्णा : हे विघ्नहर्त्यां, हे ‘करुणा’कारा तूच वाचव आता आमच्या सायेबांना… असलं इघ्नं दुष्मनावर पण येऊ देऊ नको… सायेब मंत्री झाल्यापासून एक एक इघ्नं सुरूचैत. ते मीडियावालेपण आमच्या खासगी गोष्टीत लैच नाक खुपसून र्‍हायलेत. तरी बरंय… हर तीन महिन्याच्या कामाचा अहवाल आमचे सायेब मोठ्या सायेबांकडे नेऊन मांडतेत… त्येबी केलं नसतं तर आमचं या मीडियावाल्यांनी मागंच काम तमाम केलं असतं… त्यात आमचे देवेनभाऊ, चंपकभाऊ अन् विचित्राबाईंनी लै सांभाळलं बगा… बीडच्या पेप्रावाल्याचे तर लैच उपकार हाईत… न्हाईतर इथले पेप्रावाले लै वंगाळ… एखादा कशात गटला की कच्चंच खात्यात… सुटीच देत न्हाईत… ह्या भल्या मोठ्या मोठ्या हेंडीगा अस्त्यात… दोन दोन लायनीच्या… त्यात पुन्हा सल्ले वायलेच… बाबोवऽऽऽ… आपलं तर डोकंच भनानून जातंय बगा… आमीबी त्यैंच्या पुढचे… सुप्रीम कोर्टातूनच आर्डर आणली… कुणी काई छापायचं नाई, दाकवायचं नाई… कुणी लाईव आलंय म्हटलं तरी आता काळजात नुस्तं धस्स् होतंय बगा… अन् त्या फेसबूकवाल्याला काही सांगता येतंय का बगा बाप्पा… नुसत्या नावानी फेसबूक अकाऊंट जमत नाई का म्हणावं… आमचे सायेब ‘परस्पर सहमतीतून’ काय मणले तर ‘ती’ बाई अख्खं नावच लावतीया… बोल्तानाबी तशीच सुरुवात करतीया… 24 घंटे आधीच ‘मै कल 12 बजे लाईव्ह आनेवाली हूँ’ असला ईशारा देवून ठेवतिया… तिकडं परदेशात गेलेले परळीचे आमच्याच नातीगोत्याची माणसं कोण कव्हा लाईव येतंय ह्यासाठी टपूनच बसल्याली असतात… काय गरजंय का? आरं नातीगोती सांभाळा… राजकारणामुळे नात्यागोत्यात मीठाचा खडा काऊन? आमच्या भाऊत लै संयम म्हणून चालंलय का तुमचं हे सगळं? आरंऽऽ सगळं संघर्षातून उभं केलंय. आमच्या भाऊला पण ‘संघर्ष वाघ’ म्हणत्यात. जवा आपलेच लोक दगडं घेऊन्श्यानं भाऊंच्या मागं पळत होती तीच लोकं आता सत्काराचे हार घेऊन वेट करत्यात भाऊचा… आमी त्येन्च्या सारखं जनतेनं कवा भेटायचं याचा टाईमटेबल नाय लावला बंगल्याभायेर… कवा बी या ह्या लाल किल्ल्याचे दारं सामाजिक न्यायासाठी सताड उघडे अस्तेत बगा… पण ह्याचा अर्थ असाबी नाय की लगेच ह्यावर कुणी मालकी सांगाव. व्हत असत्यात काही चुका माणसाकडून… हिंदुची शान बाळासाहेब म्हणले नव्हते का… प्यार किया तो डरना क्या… तवा कोण काय बोल्लं का?

मुषक : तुमचा सगळा प्रॉब्लम आपल्या डोक्यात लॉक करून ठीवलाय… हे प्रकरणच सामाजिक न्यायाचंय… इतक्यात ह्याचा गुंता सुटायचा नाय… जिल्ह्याचा सगळा फेरफटका मारून झाला की मग बोलू… सध्या ‘नो कमेंट’… असलं मॅटर लै नाजुक अस्तंय… हे ज्येनं त्येंनच निस्तारायचं अस्तंय… निवडणुकायचं म्हणाल तर असल्या मॅटरनं तुमाला काय फरक नाय पडणार… चला आता निगायची घाई करा… पुढं आणिक लै स्पॉटला व्हीजीट द्यायच्यात… त्यामुळं द्या आमाला हिथनं निरोप…

(हे सगळं ऐकत असताना बाप्पांच्या कानी आता वेगळाच सूर पडू लागला. कुणीतरी ओरडत होतं. पराक्रमी माणसांचे हात बांधायचे असतात का? शासन, प्रशासन न्यायव्यवस्था कुठंय..? परळी सुन्न आहे, मान खाली गेली आहे राज्याची… हे ऐकून बाप्पाने मुषकाला निघायचा इशारा केला आणि दोघे त्या आवाजाच्या दिशेने निघाले…) क्रमशः उर्वरित उद्याच्या अंकात…
बालाजी मारगुडे
– कार्यकारी संपादक, दैनिक कार्यारंभ
मो. 9404350898
दि. 12 सप्टेंबर 2021

टीप- ‘मुषकराज’ हे सदर केवळ मनोरंजनात्मक हेतूने आहे. याचा कुठल्याही राजकीय, अराजकीय घटना, व्यक्तींशी संबंध नाही. आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा…

वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
मुषकराज भाग 1 प्रस्थान
मुषकराज भाग 2 फैसला ऑन दी स्पॉट

Tagged