अंबाजोगाईतील घटना
अंबाजोगाई : दिवसाढवळ्या सराफा व्यापाऱ्याच्या दागिन्यांसह स्कुटी घेऊन चोरटे पसार झाल्याची खळबळजनक घटना आज सोमवारी (दि.७) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
राहुल राठोड असे त्या सराफा व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांचे गुरुवार पेठेत सोन्या-चांदीचे दुकान आहे. ते रविवारी रात्री दुकान बंद करून गेल्यानंतर चोरट्यांनी शटरच्या कुलुपात फेवीक्विक आणि वाळू टाकली. सोमवारी सकाळी राठोड नेहमीप्रमाणे स्कुटीच्या डिकीत सोन्याचे दागिने घेऊन दुकानाकडे आले. परंतु, कुलूप उघडत नसल्याने ते स्कुटी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चावीवाल्याकडे गेले. यावेळी ते चावीवाल्यासोबत बोलत असताना चोरट्यांनी त्यांची स्कुटी घेऊन पोबारा केला. त्या स्कुटीच्या डिकीत लाखो रुपयांचे दागिने होते. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.