‘या’ प्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदाराची शिवसेनेकडून थेट ‘सीएम’कडे तक्रार

न्यूज ऑफ द डे बीड

सीएम, शिवसेना नेत्यांच्या भुमिकेकडे लक्ष

बीड : मतदारसंघात शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिलेले विकासकामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अडवली आहेत. ही अन्यायकारक वर्तणूक मी सहन करणार नाही. सदर अडवलेली कामे तत्काळ शिवसेनेला द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी शिवसेना नेत्यांकडे शनिवारी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री अथवा शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे हा वाद कसा मिटवतात? काय आदेश देतात? याकडे राजकीय वर्तुळातून लक्ष असणार आहे.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शासकीय स्वीय सहाय्यकांकडे तसेच शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. निवेदनात पुढे म्हटले की, महाविकास आघाडी स्थापन होऊन 2 वर्षे पूर्ण झाली. विकासकामांना गती मिळावी म्हणून विकासकामे निश्चित करण्यात आली………

…….त्या अनुषंगाने आम्ही सन 2020-2021 या आर्थिक वर्षात फेब्रुवारी 2020 च्या अर्थसंकल्पात बीड तालुक्यातील चर्हाटा व पालवण गावाला जोडणार्‍या पुलांना मंजूरी मिळावी म्हणून संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती. सदर विनंती मान्य करून विशेष बाब म्हणून फेब्रुवारी 2020 च्या अर्थसंकल्पात या कामना समाविष्ट करून मंजूरी दिली. ही कामे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अडवली आहेत. अधिकार्‍यांवर दबाव तंत्राचा वापर करत आहेत. आम्ही त्यांना वारंवार विनंती करूनही त्यांनी अडवणूक सुरू केल्याने नाईलाजास्तव आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करावा लागला. ही अन्यायकारक बाबी मी तर सहन करणार नाही. सदरील कामाबाबत संबंधित यंत्रणांना आदेशित करावे अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी मुख्यमंत्र्यांसह शिवसेना नेत्यांकडे केली आहे.

Tagged