कोरोनाने पालक गमावले; बालकांना ‛शांतिवन’ देणार हक्काचे घर

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे शिरूर

अनाथ बालके निदर्शनास आल्यास संपर्क साधा : दीपक नागरगोजे

बीड : जीवघेण्या ठरलेल्या कोरोना विषाणूची लागण होऊन ज्या गरीब घरातील मुलांनी आपल्या आपल्या आई वडिलांना किंवा दोघांतील एकाला गमावले आहे, अशा 0 ते 18 वयोगटातील अनाथ झालेल्या बालकांची जबाबदारी स्विकारुन त्यांना हक्काचे मायेचे घर देण्याचा निर्णय शांतिवनने घेतला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक दिपक नागरगोजे यांनी दिली.

कोरोनाने जो धुमाकूळ घातला त्या संकटात अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. तर काही बाळांनी आपल्या लाडक्या पालकांना गमावले आहे. बीड जिल्हा, मराठवाडा आणि राज्यातील अनेक मुलं यात अनाथ झाली आहेत. काही मुलांनी आपला एक पालक गमावला तर काहींनी आपल्या दोन्हीही पालकांना गमावले आहे. प्रचंड जिवीत हानी करणाऱ्या या संकटाने हजारो लेकरांना पोरकं केलं आहे. ज्या गरीब कुटुंबातील बालकांवर ही वेळ आली आहे, त्या बालकांवर पालनपोषण आणि संगोपन करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 0 ते 18 वयोगटातील या बालकांना शांतिवनमध्ये हक्काचे घर देऊन त्यांचे पालन पोषण संगोपन आणि शिक्षण करण्याचा निर्णय शांतिवन ने घेतला आहे. ही मुलं शांतिवन मधील अधिकृत कायदेशीर असणाऱ्या शिशुगृहात (0 ते 06 वयोगट) बालगृहात (06 ते 18 वयोगट) वाढवण्यात येतील. तर शांतिवनच्या शाळेत त्यांचे शिक्षण करण्यात येईल. तसेच पुढील उच्च शिक्षणासाठी शांतिवनच्या पुण्यातील प्रकल्पात त्यांची व्यवस्था करण्यात येईल. तसेच दोन्ही पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्या बाळांना नातेवाईकांच्या संमतीने आणि कायदेशीर मार्गाने सधन कुटुंबात दत्तक देऊन उत्तम पालक मिळवुन देण्याचा प्रयत्नही शांतिवनच्या दत्तक विधान केंद्राच्या माध्यमातून कारा, सारा या सरकारी संस्थेच्या माध्यमातून करण्यात येईल. तरी बीड जिल्ह्यातील किंवा राज्यातील अशी बालके ज्यांच्या निदर्शनास येतील, त्या नातेवाईकांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी शांतिवनशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक दिपक नागरगोजे, कावेरी नागरगोजे यांनी केले आहे.

संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक
9923772694
7028372694
9421282359
Email
[email protected]

Tagged