shivraj bangar

माझं काय चुकलं? -प्रा.शिवराज बांगर

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

पोलीसांनी राजकीय व्यक्तीच्या हातचं बाहुलं होत, कुण्यातरी अधिकार्‍याचा इगो दुखावल्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्यांचं अख्खं आयुष्य कायद्याच्या दुरुपयोग करून कसं उध्द्वस्त केलं जातंय हे बीड जिल्हा पाहतोय. बीड येथील वंचित बहुजन विकास आघाडीचे माजी जिल्हा प्रमुख प्रा. शिवराज बांगर गेल्या महिनाभरापासून औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात झोपडपट्टी दादा निर्मूलन कायद्यान्वये बंदी आहेत. आज त्यांनी दैनिक ‘कार्यारंभ’ला हर्सुल कारागृहातून पत्र पाठवून माझं नेमकं काय चुकलं? असा काळीज पिळवटून टाकणारा सवाल केला आहे. त्याचं हे पत्र वाचून समाजानचं आता याचं उत्तर द्यायला हवं….

काय म्हणतात प्रा.शिवराज बांगर आपल्या पत्रात….


31 डिसेंबर 2021 रोजी सुपर्ण जग नवीन वषाृचे स्वागत करीत असताना सायंकाळी पोलीस दलातील एका हितचिंतक अधिकार्‍याचा मला फोन आला आणि त्याने मला सांगितले की तुमच्या एमपीडीए प्रस्तावावर सही झाली असून आता तुम्हाला कधीही अटक होऊ शकते. मी त्यादिवशी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी पुण्यात होतो. माझ्यावर झोपडपट्टी दादा म्हणून कारवाई झाली हे ऐकून मला प्रचंड धक्का बसला. असे असले तरी हे माझ्यासाठी अचानक नव्हते. याची कल्पना मला साधारणपणे जुन-जुलैमध्येच आली होती. परंतु याला पार्श्वभूमी होती ती साधारण 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासूनची!
मी 2019 मध्ये शिवसेना सोडून वंचित बहूजन आघाडीत प्रवेश केला. आणि गोरगरीब, दलित, शोषित पिडीतांच्या ऊसतोड कामगारांचे प्रश्न माझे वैयक्तीक प्रश्न समजून भांडू लागलो. त्यामुळे प्रशासन, शासन आणि मी असा संघर्ष उभा राहीला. यातून माझा काही नेत्यांशी आणि अधिकार्‍यांशी वाद उभा राहिल्याचे जिल्ह्याने अनुभवले आहे…

  1. मांग वउगाव येथे पारधी समाजातील तीन लोकांची निघृर्ण हत्या झाल्यानंतर 48 तास पडून असलेले मृतदेह पोलीस व पारधी समाजात समन्वय घडवून आणत ताब्यात घ्यायला लावणारा मी.
  2. 2017 पर्यंत फिनिक्स स्पर्धा परीक्षा केंद्र व 2018 पासून जोराबा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील 100 गरीब मुले निवडून त्यांना पोलीस दलात भरती करणारा मी.
  3. कोरोना महामारीत स्वखर्चाने 50 क्विंटल धान्य आणि किराणा वाटणारा मी.
  4. ऊसतोड कामगारांसाठी अन्नछत्र चालवून त्यांना महामारीत घरी सुखरूप पोहचवणारा मी.
  5. ऊसतोड कामगारांचा अपघात झाल्यावर सर्वप्रथम त्यांना मदत करणारा मी.
  6. कोरोना काळात जिवाची पर्वा व कुटुंबाची पर्वा न करता दिवसरात्र रुग्णांना सेवा देणारा मी.
  7. कोरोना काळात बीडमध्ये मोफत अ‍ॅम्ब्युलन्स सेवा देणारा एकमेव मी.
  8. कोरोना काळात सेवा बजावणार्‍या महिला डॉक्टर, नर्स, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना माझ्या मालकीच्या द वूमन्स वर्ल्ड प्रोफेश्नल सलून अ‍ॅन्ड बुटीक मध्ये मोफत सेवा देणारा मी.
  9. माझ्या मालकीच्या द वूमन्स वर्ल्ड प्रोफेश्नल सलून अ‍ॅन्ड बुटीक मध्ये आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या मुलांना व पत्नीला 100 टक्के मोफत शिवण ऊसतोड कामगार पाल्य व एकल महिलांना नाममात्र फीसमध्ये प्रशिक्षण देणारा मी.
  10. बीड जिल्ह्यातील कुठेही अन्याय, अत्याचाराची घटना घडल्यावर सामंजस्याची न्यायीक भूमिका घेऊन व सोबत मदत घेऊन सर्वप्रथम पोहचणारा मी.
  11. गेल्या 15 वर्षांच्या रातकीय कारकीर्दीत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पदे असताना कुठल्याही नंबर दोनच्या व्यावसायात नाव नसलेला मी.
  12. वयाच्या 35 वर्षात सुपारीचेही व्यसन नसलेला मी.
  13. विरोधकांनी मला राजकीय व आर्थिक दृष्ट्या संपविण्यासाठी अनेकवेहा कमरेखालचे वार माझ्यावर केले. ते मी आज औरंगाबादच्या कारागृहात बंद असतानाही सुरूच आहेत. हे सर्व सहन करत लोकांनी केलेले प्रेम आणि तिरस्कार यांचा स्वीकार करत मतलबी जगात ताइ मानेने उभा असलेला मी.
  14. खिशात शेवटचा रुपया शिल्लक असेपर्यंत लोकांची मदत करणारा मी.
  15. ऊसतोड कामगारांच्या हक्कांसाठी स्वतःच्या बायकोचे दागीने गहाण टाकून लढा उभारणरा मी. लिहीत बसलो तर कित्येक पाने भरतील… हा धावता मागोवा मागील दोन वर्षांचा आहे. मग हे सर्व करत असताना मी नेमका झोपडपट्टी दादा कसा ठरलो? या प्रश्नाचे उत्तर शोधताना प्रामुख्याने जून 2021 मध्ये बीड जिल्ह्यातील एका घटनेशी आणि काही प्रमाणात पोलीस अधिकारी आणि त्यांच्या जीवावर दलाली करून आपले खिसे भरणार्‍या नेत्यांपाशी आहे.

घटनाक्रम व माझ्यावर लादलेली एमपीडीए…
साधारण जूनची 27 किंवा 28 तारीख असावी. वंचित बहूजन अघाडीचा पूर्णवेळ कार्यकर्ता असलेल्या तरूणाची बहीण जी कोरोना काळामध्ये नर्स म्हणून जिल्हा रुग्णालय बीड येथे सेवा देत होती. ती शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड येथे जावून माझ्यावर मी 15 वर्षांची असल्यापासून गावातील गुंड तरुण अत्याचार करत असून संबंध सुरू न ठेवल्यास माझ्यासह माझ्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत असल्याबाबत फिर्याद देण्यासाठी गेली असता तत्कालीन अमलदार तिला शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पीआय यांच्यासमोर उभे करतात. त्या नर्सला जात विचारली जाते. तिने दलित जात सांगताच तिला अतिशय खालच्या भाषेत ते अधिकारी बोलतात. व तक्रार न घेताच एनसीआर घेऊन तिला हाकलून देतात. त्यानंतर सदरील ठाणे अमलदार आरोपीशी संपर्क करून त्याला त्याच्याविरुद्ध तक्रार असल्याची माहिती देतात. साधारण दोन तासात तो तक्रारदार फिर्यादी मुलीच्या घरी येतो… त्यावेही ती मुलगी बचावासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याला फोन लावते. मात्र कोणीही मदतीला येत नाही. आरोपी मुलीचे अपहरण करतो व गेवराई जवळ तिचा अपघात घडवून आणतो. मुलगी गंभीर जखमी होते.
मुलीचा भाऊ जो वंचित बहूजन आघाडीचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. तो मला फोन करून सदरील घटना सांगतो. त्यानंतर बीड येथे आणून सर्व चाचण्या खाजगी ठिकाणी करून मुलीला शासकीय दवाखान्यात अ‍ॅडमीट केले जाते. मुलीने सांगितलेल्या घटनेबद्दल खाली खात्री करून मी स्वतः सदरील अमलदारास फोन केल्यास मी वरीष्ठांच्या आदेशाने गुन्हा दाखल केला नाही असे सांगतात. मी त्यांना मुलीची परिस्थिती सांगुनही कोणीही फिर्याद घेण्यासाठी येत नाही. शेवटी मा. पालकमंत्री महोदयांच्या कानावर ही घटना गेल्यावर त्यांच्या आदेशाने महिला पीएसआय गुनहा दाखल करण्यासाठी येतात. त्याही मुलीला अश्लिल व जातीवाचक भाषेत बोलतात. आणि मुलीच्या सांगण्याप्रमाणे फिर्याद न घेता रॅण्डम फिर्याद घेतात. दि.5 जुलै 2021 रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला 376, पोस्को, 307, 363, 366 प्रमाणे गुन्हा दाखल होतो. जर 27 जून 2021 रोजी गुन्हा दाखल केला असता तर मुलीचे अपहरण करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न झालाच नसता. या मागणीसाठी आणि संबंधित घटनेस जबाबदार असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी सनदशीर व संविधानिक मार्गाने जिल्हाधिकारी बीड, पोलीस अधीक्षक बीड, पालकमंत्री बीड, गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदने व तक्रार अजे दिले, मात्र आम्हाला यंत्रणेकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आम्ही संविधानिक मार्गाने उपोषण करण्याचे निवेदन दिल्यानंतर वरील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी राजकीय पदाधिकारी, गुन्हेगार यांच्या मार्फत माझ्यावर दबाव आणने सुरू केले, मात्र मी त्यांच्या धमकीला न घाबरता उपोषण सुरू केल्यांनतर माझ्या उपोषण स्थळी येवून तात्काळ उपोषण सोड अन्यथा तुझ्यावर एमपीडीए अंतर्गत कार्यवाही करून तुला जेलमध्ये टाकू असे एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले, परंतू माझा गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याने मी निर्धास्त होतो. माझ्यावर केवळ आंदोलनाचे किरकोळ गुन्हेच असल्याने व महाराष्ट्रातील पोलीसदल व न्याय व्यवस्थेवर माझा दृढ विश्वास असल्याने माझ्यावर अन्याय होणार नाही याची मला खात्री होती. मात्र सदरील दोन्ही अधिकारी यांचे राजकीय हात फार लांब आहेत. दोन्ही अधिकारी यांनी आपल्यावर कारवाई होईल या भितीने माझा एमपीडीए प्रस्ताव तयार केला. शिवाजीनगर पोलीस स्टेशनची तत्कालीन प्रभारी यांच्या कारभाराबाबात विनायक मेटे, अमरसिंह पंडित यांच्यासह अनेकांनी लेखी तक्रारी केलेल्या आहेत. सदरील महाशयांना बीड येथे नोकरी करायची नव्हती म्हणून ते सर्व लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांना अपमानास्पद वागणूक देत होते. त्यांनी माझा एमपीडीए प्रस्ताव केल्यावर माझ्यावर खालील गुन्हे नोंद आहेत.

1) सन 2013 साली मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून बार्शी नाका बीड येथे आंदोलन केल्याचा गुन्हा

2) सन 2017 साली बीड नगरपालीका येथे आंदोलन केल्याचा गुन्हा

3) सन 2017 साली ज्या गुन्ह्यांमध्ये माझा संबंध नाही अशा स्वरुपाची एनसीआर चालक पोलीस पत्नीने दिलेली आहे.

4) सन 2020 साली ऊसतोड कामगार संपामध्ये कामगारांचा गाड्या अडऊन परत पाठवल्याचा गुन्हा दाखल. सन 2021 साली दलीत कर्मचारी यांना एसटी महामंडळाकडून काम करत नसल्याचा खुलासा व त्याच दिवशी त्यांना निलंबित केले. म्हणून दलित कर्मचारी माझ्याकडे आल्यानंतर समन्वयासाठी विभागीय नियंत्रक व कर्मचारी यांच्यामध्ये गोंधळ झाल्यावर विभागीय नियंत्रक यांनी शासकीय कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल केला.

5) सन 2021 मध्ये बीउ जिल्ह्यातील मोची पिंपळगाव येथे बेकायदेशीर मिक्सर प्लांटमुळे रस्त्यांची दुदर्शा होत आहे. तसेच श्वसनाचे आजार होत आहेत. म्हणून रास्तारोको केला होता. त्या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल गुन्हा दाखल केला.

6) 11 ऑगस्ट 2021 रोजी ज्या व्यक्तीला मी माझ्याकडं 35 वर्षाच्या कालावधीत कधी भेटलो देखील नाही, कधी भेटलो नाही. अशा व्यक्तीला माझ्या विरोधात उभं करून मारहाण केल्याची एनसी दाखल करण्यात आली. मात्र सदरील व्यक्तीने कोर्टासमोर शपथपत्र देताना सांगितले की मी अशी कुठलीही तक्रार दिलेली नाही. अशा प्रकारच्या अनेक एनसी तत्कालीन अधिकार्‍यांच्या काळात झालेल्या आहेत.

मी आज एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून चुकीच्या एमपीडीए कारवाईमध्ये कारागृहात बंद आहे. माझ्यावर झालेल्या कार्यवाहीबाबत टीव्ही तसेच वर्तमानपत्रात प्रसारीत झालेले आहे. यामुळे माझे प्रचंड मानसिक, आर्थिक व सामाजिक नुकसान झालेले आहे.
तरी बीड जिल्ह्यातील सुजान नागरिकांनी, पत्रकार बांधवांनी, संपादक, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी मला सांगावे की मी कोणत्या अँगलने झोपडपट्टी दादा वाटतो?
मान्य आहे माझा स्वभाव थोडासा आक्रमक आहे. मी लोकांचे प्रश्न माझे स्वतःचे प्रश्न समजून ते सोडवण्यासाठी भांडतो. कधीकाळी आपल्या सोबतही भांडलो असेल पण माझा हेतू समोरच्या व्यक्तीचा प्रश्न सुटला पाहीजे असा असतो. भावनेच्या भरात समोरचा माणूस अडचण सांगताना खरे बोलतोय की खोटे याचा फार विचार मी कधीच केला नाही. माझ्या या स्वभावाचा अनेकांनी गैरफायदा घेतला आहे.
आज माझ्या मुलांना जर कोणी विचारले की तुझा बाबा आम्ही टीव्ही वर आणि वर्तमान पत्रांमध्ये पाहीला असून तो गुंड आहे तर माझ्या मुलांच्या मनावर याचा काय परिणाम होईल? याचा विचार करूनच माझ्या मनात तिरस्कार निर्माण होत आहे.

आपला
प्रा. शिवराज बांगर
एमपीडीए- 49 बंदी, औरंगाबाद हर्सुल कारागृह

Tagged