मनमाडजवळ अंगठ्या सुळक्यावरून पडून अहमदनगरच्या दोन ट्रेकर्सचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बीड

महावीर पोकर्णा, अहमदनगर

नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अंगठ्या डोंगरावरून काल सायंकाळच्या सुमारास प्रस्तरारोहण करताना खाली पडून अहमदनगर येथील दोन ट्रेकर्सचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला असून इतर १३ ट्रेकर्स सुखरूप असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळाली आहे.

हा डोंगर हा चांदवड तालुक्यातील असून काल सायंकाळच्या सुमारास घटना घडल्यामुळे अंधारामुळे दुसरा मृतदेह शोधण्यास मदतकार्याला मोठा विलंब झाला व अडथळाही येत होता. रात्री उशिरा मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमी ट्रेकर्सला आणण्यात आले. अहमदनगर येथील इंद्रप्रस्थ ट्रेकर्स ग्रुपच्या ८ मुली आणि ७ मुले अशी १५ जणांची टीम आठ दिवसांचे नियोजन करुन आज सकाळी ट्रेकिंग करण्यासाठी मनमाडनजीक असलेल्या हळबीची शेंडी अर्थात अंगठ्या डोंगरावर आले होते. हे सर्वजण अंगठ्या डोंगरावर चढले. तेथून पुढे अंगठ्याच्या आकाराच्या सुळक्यावर त्यांनी यशस्वी चढाई केली.

त्यासाठी त्यांनी खिळ्यांच्या साहाय्याने रोपवे बांधला होता. यशस्वी चढाईनंतर हे सर्व ट्रेकर्स खाली उतरत होते. दोन पट्टीचे ट्रेकर मयूर दत्तात्रेय म्हस्के (२४) व अनिल शिवाजी वाघ (३४) हे मामा-भाचे हे सर्वात शेवटी होते. रोप-वे वरून खाली येत असताना व या रोपवेचे खिळे काढत असताना हे दोघेही व प्रशांत पवार अन्य एक सुळक्यावर खाली पडले.

या घटनेमुळे १३ ट्रेकर्समध्ये खळबळ उडाली. ते घाबरून गेले. कसेबसे त्यांनी जखमींना डोंगरावरून खाली आणण्याचा प्रयत्न केला. तेथील ग्रामस्थही मदतीला धावले. रात्री उशिरा जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी मनमाडकरही मदतीला धावले. प्रभारी
पोलीस अधिकारी पी.बी. गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत घटनेची माहिती घेतली.