बीड दि.26 : प्रेमप्रकरणातून बहिणीला पळवून नेल्याचा भावाच्या मनात राग होता. दोघे परत आल्यानंतर महिनाभरानंतर मुलीच्या भावाने चाकूने भोसकून प्रियकराची हत्या केली. ही थरारक घटना तालुक्यातील नाथापूर येथे 25 जून रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता घडली. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सुंदर साहेबराव कसबे (वय 22, रा.पिंपळादेवी, ता.बीड) असे मयताचे नाव आहे. तो ऊसतोड मजुर आहे. ऊसतोडीचे काम करताना त्याची ओळख माजलगाव तालुक्यातील लऊळ क्र.2 येथील एका तरुणीशी झाली. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. महिनाभरापूर्वी ऊसतोडीहून दोन्ही कुटुंबे गावी परतली. प्रेमप्रकरणातून सुंदर कसबे याने मुलीला पळवले होते. मात्र, कुटुंबीयांनी विरोध केल्यावर त्याने पुन्हा त्यांच्या स्वाधीन केले. तसेच ऊसतोड मुकादमाने त्यांच्यातील वाद बसवून मिटवलाही होता. मात्र, मुलीचा भाऊ शिवाजी ऊर्फ बाबा चांदणे याच्या मनात त्याच्याविषयी राग होता. 25 जून रोजी सुंदर कसबे हा आईवडीलांसोबत नाथापूर येथे आठवडी बाजारासाठी जात होता. परंतु वाटेतच पेट्रोल भरण्यासाठी तो पंपावर थांबला. आईवडीलांना रोडला उभं केलं. यावेळी पंपामध्ये रिक्षात आलेल्या शिवाजी व त्याच्या अन्य साथीदारांनी सुंदरला उचलून पंपाच्या पाठिमागे नेऊन त्यावर चाकूने सपासप वार केले. व रक्ताच्या थारोळ्यात सोडून सर्व पसार झाले. माहिती मिळताच पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव, उपनिरीक्षक बाबासाहेब खरात, पो.ना. रामप्रसाद कडुळे व सहकार्यांनी तेथे धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. दुपारी शवविच्छेदनानंतर त्यावर गावाकडे अंत्यविधी करण्यात आला. याप्रकरणी नातेवाईकांच्या जबाबावरुन गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पिंपळनेर पोलीसांनी दिली.