SUSHIL KHODAVEKAR

आयएएस सुशील खोडवेकराचा जामीन अर्ज फेटाळला

क्राईम न्यूज ऑफ द डे

बीड, दि. 2 : शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावल्याप्रकरणी अटकेत असलेले आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांचा अंतरिम जामीन अर्ज बुधवारी न्यायालयाने फेटाळला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी हा आदेश दिला.

खोडवेकर याने तुकाराम सुपे याच्यावर दबाव टाकत जीए सॉफ्टवेअर या कंपनीला ब्लॅक लिस्टमधून बाहेर काढण्याचे काम केले होते. शिवाय सुपेला सांगून अनेक शिक्षकांना टीईटीमध्ये पैसे घेऊन पास केले होते, असा आरोप त्याच्यावर आहे.

खोडवेकर कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यामुळे त्याच्या वकीलांनी जामीनासाठी अर्ज केला. याबाबत दोनही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने खोडवेकर यांचा अर्ज फेटाळला आहे. खोडवेकर याने वकिल एस. के. जैन व अमोल डांगे यांच्यामार्फत अंतरिम जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. खोडवेकर याला कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्याच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज आहे. त्यामुळे खोडवेकर याला अंतरिम जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.
या जामीन अर्जास सायबर पोलिसांच्या वतीने सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी विरोध केला. आरोपी प्रभावशाली पदावर काम करत असून, त्याच्या चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीचा कालावधी संपलेला नाही. राज्य सरकार त्याच्या आरोग्याची काळजी घेत आहे. त्यामुळे आरोपीला जामीनावर मुक्त करण्यात येऊ नये, असा युक्तिवाद जाधव यांनी केला.

या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने तपशीलवार चौकशी झालेली नाही. आरोपी आपल्या पदाचा गैरवापर करून तपास व साथीदारांवर दबाव आणू शकतो. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असे म्हणणे तपास अधिकार्‍यांनी मांडले.
खोडवेकर यांना योग्य उपचार सुविधा मिळत आहेत. अर्जदार आरोपी आयएएस अधिकारी असून प्रभावशाली पदावर कार्यरत आहे. अंतरिम जामीन मंजूर झाल्यास ते तपासात अडथळे आणण्याची आणि पुराव्यात छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोपीचा जामीन फेटाळण्यात येत आहे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. सुशील खोडवेकर हा मुळचा परळीत तालुक्यातील खोडवा गावचा आहे. त्यामुळे परळीचं काही कनेक्शन यात आहे का याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.