‘न्यासा’ सायबर पोलिसांच्या कचाट्यात!

क्राईम न्यूज ऑफ द डे

आणखी दोन मोठे दलालही अटकेत

पुणे : आरोग्य भरतीच्या पेपरफुटी प्रकरणात आता न्यासा ही परीक्षा घेणारी कंपनी देखील पुणे सायबर पोलिसांच्या कचाट्यात सापडली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. या पेपरफुटी प्रकरणात सामील असलेल्या न्यासाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

२४ ऑक्टोबर रोजी झालेला आरोग्य विभागाचा गट क चा पेपरही फुटला होता. यामध्ये न्यासा कंपनीचे अधिकारी सहभागी होते अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली. गट ‘ड’ चा पेपर न्यासाचे अधिकारी आणि बोटले आणि बडगिरे अशा दोन व्यक्तींच्या माध्यमातून फुटला. दोघे एकमेकांशी संबंधित होते का याचा तपास सुरू आहे. गट ‘क’ चा पेपर फोडण्यात न्यासाच्या अधिकाऱ्यांसोबत सहभागी असलेल्या दोन दलालांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

असा फोडला परीक्षेचा पेपर
एका पेपरसाठी हे दलाल पाच ते आठ लाख रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे. न्यासा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी देखील यात सहभागी आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. न्यासाच्या अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिका प्रिंट करताना पेपर फोडला असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.

दोन मोठे दलाल अटकेत
निशीद गायकवाड (रा. अमरावती) यांनी काही लोकांच्या मदतीने आरोग्य विभाग गट क पदाचे परीक्षेचे पेपर परीक्षेपुर्वीच फोडून एजंटद्वारे पैसे स्विकारुन परीक्षार्थीकडे पेपर प्रसारीत केल्याची माहिती मिळाली. त्या माहितीची पथकाव्दारे संबंधीताकडे खातरजमा केली असता त्यात तथ्य आढळल्याने आरोग्य विभागास सदर बाब पत्राव्दारे या पेपर फुटी संदर्भाने कायदेशीर कारवाईसाठी तक्रार करण्यास कळविले आहे. त्याप्रमाणे संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांनी प्राधिकृत केल्यावरून त्यांचे कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता रविंद्र कारेगावकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सदरहू पेपर फोडणारे महेश बोटले, प्रशांत बडगिरे, डॉ. संदीप जोगदंड, राजेंद्र शहाजी सानप, निशीद रामहरी गायकवाड, राहूल धनराज लिघोट व इतर यांच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६० / २०२१ भादंवि कलम ४०६,४०९, ४२०, १२० (ब), ३४ सह महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम (१९९० सुधारीत) कलम ३५. ६, ८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी नामे निशीद रामहरी गायकवाड (वय ४३, धंदा शेती, सध्या रा. ५०१, शेवाळकर गार्डन, साऊथ अंबाझरी रोड, नागपूर, मुळ पत्ता – ५२ आशियाड कॉलनी, शेगांव-रहाटगांव रोड, अमरावती) व त्याचा सहकारी राहूल घनराज लिघोट, (वय ३५ ₹, धंदा- ट्रेडिंग, रा. देवी पार्क, जावरकर लॉनच्या मागे, शेगांव-रहाटगांव रोड, अमरावती) यांचा या गुन्हयामध्ये सक्रीय सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. त्यांचेकडे व उर्वरित आरोपीतांकडे अधिक तपास करण्यात येत आहे. सदर गुन्हयाचा तपास पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, आर्थिक व सायबर गुन्हे पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त विजय पळसुले, पो.नि डी.एस. हाके यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.जयंत राजूरकर, नेमणूक युनिट ४ गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत. या गुन्ह्यातील तपासाचे कामगिरीमध्ये सायबर पोलीस ठाण्यातील पोनि मिनल सुपे-पाटील, पोउनि डफळ, पोलीस अंमलदार राजकुमार जाना, पुंडलीक, अश्वीन कुमकर, चालक सोनूने शाहरुख शेख, श्रीकांत कबूले या पथकाने बहुमोल मदत केलेली आहे.

Tagged