विद्यमान नगरसेवकांची अनेक ठिकाणी गोची
वडवणी : नगरपंचायतची मुदत संपल्यानंतर नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यासंदर्भात आरक्षण सोडत आज (दि.१५) तहसिल कार्यालयात सकाळी ११ वाजता पार पडली.
१७ नगरसेवक असलेल्या नगरपंचायतची मुदत संपताच नव्याने निवडणूका घेतल्या जाणार असुन होणाऱ्या निवडणूकीत आरक्षण सोडत पध्दतीने जाहीर झाले. यामध्ये ओबीसी महिलांसाठी प्रभाग क्रमांक 4, 5, आरक्षित करण्यात आले. ओबीसी सर्वसाधारणसाठी प्रभाग क्रमांक 6 व 13 आरक्षित आहेत. अनुसूचित जाती महिलासाठी प्रभाग क्रमांक 17 तर अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी प्रभाग क्रमांक 1 आरक्षित ठेवले आहेत. सर्वसाधारण महिलासाठी प्रभाग क्रमांक 8, 10, 12, 14, 15 आरक्षित जागा असून सर्वसाधारणसाठी प्रभाग क्रमांक 2, 3, 7, 9, 11 आहेत. महिला आरक्षणासह अन्य आरक्षण नियमाप्रमाणे काढले असून 2015 च्या निवडणुकीत ज्या ठिकाणी महिलासाठी आरक्षित होते. त्याठिकाणी नव्याने आरक्षण सोडतीने मातब्बरांची गोची झाली आहे. आरक्षण सोडतीसाठी उपविभागीय अधिकारी तथा नगरपंचायत प्रशासक निलम बाफना तहसीलदार प्रकाश सिरसेवाड, नायब तहसीलदार तथा नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी एस.के.मंदे, नगरपंचायत कार्यालयीन अधिक्षक आर.एल.सोळंके, पी.एस.मस्के, एस.डी.मेटे, राम शिंदे सर्व कर्मचारी प्रिया शिंदे व अनुष्का शिंदे या दोन लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली.