मोर्चेकर्‍यांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट व्हाव्यात!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : कोरोनाने बीडभोवती आपली मगरमिठी आवळलेली असताना  जबाबदार राजकीय पक्षांना त्याचं गांभीर्य नाही. शनिवारी भाजपने दुधाला वाढीव दर देण्याच्या मागणीसाठी जिल्हाभर आंदोलन केले. पण या आंदोलनात कोरोना होऊ नये म्हणून खबरदारी व नियम पाळले गेले का? इथून पुढे होणार्‍या एकाही आंदोलनाला जिल्हा प्रशासनाने परवानगी देऊ नये. बकरी ईदच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून कसाई बांधवांच्या अ‍ॅन्टीजन टेस्ट केल्या. त्यात तब्बल 7 कसाई बांधव पॉझिटिव्ह आढळले. अ‍ॅन्टीजन टेस्ट केल्या नसत्या तर किती मोठा अनर्थ जिल्ह्यावर ओढवला असता याची कल्पनाच न केलेली बरी.

भाजपने केलेल्या आजच्या आंदोलनामध्ये कोणीच पॉझिटिव्ह नव्हते याची कोणी खात्री देऊ शकते का? थोडावेळ असेही मानुयात की भाजपचे कार्यकर्ते निगेटिव्ह होते. पण आंदोलनात दिलेल्या बंदोबस्तातील पोलीस निगेटिव्ह होते का? आपल्या समाधानासाठी आपण म्हणूयात पोलीसही निगेटिव्ह होते. पण मग बघ्यांच्या गर्दीतील सगळेच निगेटिव्ह  होते, असे म्हणता येईल का? मोर्चाच काढायचाय म्हटल्यावर कितीही युक्तीवाद करता येईल. पण युक्तीवादाने प्रश्न संपणार नाहीत. समाजातील शहाण्या सुर्त्यांनी आपली जबाबदारी म्हणून गर्दी टाळावी. आपल्यामुळे कोरोनाची साथ पसरणार नाही, याची दक्षता ज्यांनी त्यांनी घ्यावी. जिल्हा प्रशासनानेही इथून पुढे चार किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना आंदोलन करायचे झाल्यास अ‍ॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक करावी. कारण अनेक कोरोनग्रस्त अंगावर कोरोना घेऊन फिरत आहेत. त्यांचा समाजासाठी धोका आहे. कळत – नकळतही ते कुठल्याही निमित्ताने गर्दीचा भाग झाले तर कोरोनाची साथ हाताबाहेर जाईल.

गर्दीच्या आंदोलनाला पर्याय नाही का? शेतकर्‍यांच्या दुधाला भाव नाही हा मुद्दा रास्त आहे. त्यांच्या दुधाला दर मिळायलाच हवाय. सरकारला जर हे समजत नसेल तर लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा पर्याय आहे. परंतु आजच्या परिस्थितीत गर्दी न करणे सर्वांच्या हिताचे आहे. त्यासाठी गर्दीच्या आंदोलनाला पर्याय म्हणून आपणही वेगळे आंदोलन करायला काय हरकत आहे. उदा. सरकारी खात्यात प्रत्येकाने 1 रुपया टाकून सरकारचा निषेध नोंदविणे, शेतकर्‍यांकडील दूध सत्ताधारी आमदारांच्या, जिल्हाधिकार्यांच्या, पालकमंत्र्यांच्या व इतर सर्वच विभागप्रमुखांच्या घरी नेऊन देणे त्या दुधाची आंदोलनकर्त्यांना हवी असलेली किंमत गांधीगिरी मार्गाने घेणे, किंवा घरच्या घरीच प्रत्येक कार्यकर्त्याने मुख्यमंत्री पालकमंत्री यांच्या फोटोला दुधाने आंघोळ घालणे. किंवा प्रत्येकाने दुधाची एक पिशवी विकत घेऊन ती आंदोलन करावयाच्या ठिकाणी आणून ठेवणे आणि निघून जाणे. दिवसभरात कितीतरी पिशव्या जमा होतील. याची विल्हेवाट लावताना प्रशासनाच्या नाकीनऊ येतील. अशा आंदोलनाने सोशल डिस्टंन्सिंगची समस्या निर्माण होणार नाही आणि आपल्या हाताने दुधाची नासाडी केली याचं पातक तुमच्या माथी लागणार नाही. बघा जमतंय का?

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged