लसीकरणावर भर द्या : जिल्हाधिकारी
बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव आटोक्यात आला असला तरी पूर्ण लसीकरणाची आवश्यकता आहे. त्यामुळे लसीकरणावर भर देण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी गुरुवारी दिले. तसेच, सर्व आस्थापना ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवा, असेही आदेश आहेत.
आदेशा पुढे म्हटले की, सर्व आस्थापनांचे कर्मचारी, होम डिलिव्हरी करणारे व्यक्ती, सार्वजनिक वाहतूक वापरकर्ते यांसह सार्वजनिक सर्व प्रकारच्या आस्थापनांमध्ये अभ्यागतांना पूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे. आदेशाचे पालन न केल्यास साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंडसंहिता १८६० कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिला आहे.
गर्दीवर निर्बंध
सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम, समारंभात एकूण उपस्थिती स्थळाच्या क्षमतेच्या ५० टक्के किंवा २०० पेक्षा कमी लोकसंख्या असावी.
शाळा सुरू करा, पण
कोविड नियमांचे पालन करून पूर्व प्राथमिक शाळा, अंगणवाड्या प्रत्यक्षरीत्या सुरू करता येतील. त्याठिकाणी नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.
या आस्थापनांमध्ये ५० टक्के उपस्थितीची मर्यादा
जिल्ह्यातील सर्व शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट आणि बार, कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळे, नाट्यगृहे, पर्यटन स्थळे, मनोरंजन उद्याने या आस्थापना ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. दरम्यान, सर्व शासकीय, खाजगी कार्यालये, औद्योगिक, विज्ञान संस्था पूर्ण क्षमतेने सुरू राहतील.
प्रवासावर निर्बंध नाहीत, पण
आंतरराज्य आणि राज्यांतर्गत प्रवासावर कोणतेही निर्बंध नाहीत, पण त्यासाठी पूर्ण लसीकरण असणे बंधनकारक आहे. पूर्णपणे लसीकरण न झालेल्या व्यक्तींसाठी आंतरराज्य प्रवासासाठी ७२ तास वैधतेची आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल बंधनकारक आहे. प्रवासासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही.