बंडखोर आमदारांच्या घरांना केंद्राची सुरक्षा!

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र


15 आमदारांची घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार

मुंबई दि.26 : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यांच्यासह बंडखोरी करणार्‍या आमदारांच्या विरोधात राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर येत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर शिवसेना आमदारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बरीच खलबतं झाल्यानंतर आता या आमदारांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आलं आहे.

शिंदे गटातील 15 आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. काल झालेल्या तोडफोडीच्या आणि हिंसक घटनेनंतर केंद्र सरकारची शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. आज संध्याकाळपर्यंत 15 आमदारांच्या घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. सध्या आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. आता बाकीचे आमदार कोण आहेत याची माहिती देखील लवकरच मिळणार आहे. दादर भागात राहणार्‍या आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आलं आहे. तसेच वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांच्या कार्यालयाला आणि घराला केंद्राची सुरक्षा देण्यात आली आहे. काही वेळापूर्वी वैजापूरमध्ये सीआरपीएफचे जवान दाखल झाले असून, त्यांनी बोरनारे यांच्या घराचा ताबा घेतला आहे.

या आमदारांच्या घरी सीआरपीएफ तैनात
रमेश बोरनारे, मंगेश कुडाळकर, संजय शिरसाट, लता सोनावणे, सदा सरवणकर, योगेश कदम, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, प्रदीप जायस्वाल, संजय राठोड, दादाजी भुसे, दिलीप लांडे, बालाजी कल्याणकर, संदिपान भुमरे यांच्या घरी सीआरपीएफ तैनात करण्यात येणार आहे.

Tagged