कडा, दि.3 : पंचायत समितीतील गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर अरेरावीची भाषा वापरणार्या पंचायत समिती सदस्याच्या श्रीमुखात महिला शिपायाने भडकावली. बुधवारी (दि.29) येथील पंचायत समितीत दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
याबाबत समजलेली माहिती अशी, की येथील पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांचे बंद दालनासमोर महिला शिपाई बसल्या होत्या. या वेळी एका पंचायत समिती सदस्याने तेथे येत महिला शिपायास अरेरावीची भाषा वापरली. यामुळे संतप्त होत या महिला शिपायाने पायातील चप्पल काढून चार-पाच वेळा या पंचायत समिती सदस्याच्या श्रीमुखात भडकावली. यानंतर या पंचायत समिती सदस्याने तेथून पळ काढला. या प्रकारामुळे पंचायत समिती परिसरात दुपारनंतर चर्चा सुरू होती.
दोघांचीही समज काढणार-मुंडे
मी जेवण करण्यासाठी घरी गेलो होतो. कार्यालयात परत आल्यानंतर मला हा प्रकार समजला. याबाबत कसलीही तक्रार प्राप्त झाली नसून दोघांचीही समज काढण्याचा माझा प्रयत्न राहील.
–सुधाकर मुंडे, गटविकास अधिकारी,पंचायत समिती आष्टी
दरम्यान या आगोदरही हा पंचायत समिती सदस्य कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो हा पंचायत समिती सदस्य कोणत्याच अधिकार्याला नीट बोलत नसून कायम आरेवावीच करत असतो असेही पंचायत समितीतील कर्मचारी बोलत होते.