मित्राच्या लग्नात बेधुंद डान्स केला अन् हृदयविकाराने मृत्यू झाला!

क्राईम न्यूज ऑफ द डे माजलगाव

माजलगाव दि.28 : मित्राच्या लग्नात निघालेल्या मिरवणुकीत वाद्याच्या तालावर बेधुंद डान्स केला. त्यानंतर तहान लागल्याने पाणी पिण्यात आले. यावेळी तरुणाला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला, यातच त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी येथे रविवारी (दि.27) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

वैभव रामभाऊ राऊत (वय 25 रा.मनुर ता.माजलगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी शिंदेवाडी येथे माने-कोळसे शुभविवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नात नवरा-नवरी दोघेही शिंदे वाडी गावातील रहिवासी होते. लग्नातील नवरदेव अक्षय माने यांच्या विवाह असल्याने त्याचे माजलगाव, मनुर येथील मित्र लग्नास आले होते. त्यात वैभव रामभाऊ राऊत हा देखील होता. सायंकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास लग्नापूर्वी मारुतीला पाया पडण्यासाठी नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी सुरू असलेल्या वाद्यांच्या तालावर सर्व तरुण मंडळी बेधुंद नाचत होती. अगोदरच दिवसभर असलेला उन्हाचा पारा व त्यातच बेधुंद नाचणे बराच वेळ सुरू होते, मिरवणूक लग्न स्थळी येताच तेथे वैभव राऊत मित्रांसह खुर्चीवर बसला व तेथे बसून त्याने तहान लागल्याने गटागटा असे पाणी पिले. त्यानंतर लगेच त्याला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला, त्यामुळे गोंधळ उडाला, घटनेनंतर त्यास माजलगाव येथील खाजगी दवाखान्यात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांस मृत घोषित केले, या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

Tagged