केजच्या मुकादमाचे शीर धडावेगळे करुन हिरण्यकेशी नदीत फेकले!

केज क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

अपहरणकर्त्यांनी सुटकेसाठी केली होती 12 लाख रुपयांची मागणी ;तिघे ताब्यात
केज
दि.15 ः तालुक्यातील लव्हरी येथील ऊसतोड मुकादम सुधाकर चाळक यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यांना मारहाण करत त्यांच्या मुलांकडे सुटका करण्यासाठी 12 लाख रुपयांची मागणी केली जात होती. पैसे न दिल्यास कापून टाकू अशी धमकी देण्यात आली होती. अखेर या अपहरणकर्त्यांनी नियोजित कट रचून निर्दयीपणे चाळक यांचा खून केला. तसेच त्यांचे शीर धडावेगळे करुन हिरण्यकेशी नदीत फेकले तर शीर काही अंतरावर फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची माहिती अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर दिली. सदरील मृतदेहाचा पोलीसांची पथके हिरण्यकेशी नदीपात्रात शोध घेत आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, केज तालुक्यातील लव्हुरी येथील सुधाकर उर्फ सुदाम चाळक हे महालक्ष्मी साखर कारखाना तेर येथे मजूर पुरवठा अधिकारी म्हणून काम करीत होते. त्यांचे 16 फेब्रुवारी रोजी लव्हरी येथून अज्ञातांनी अपहरण केले. या प्रकरणी 25 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्याची नोंद केज पोलीसात केली. त्यानंतर त्यांचा भाऊ, मुले यांना चाळक यांच्या फोनवरुन अज्ञातांनी फोन करत चाळक यांच्या सुटकेसाठी 12 लाख रुपयांची मागणी केली. तसेच त्यांना मारहाण करत असल्याच्या रेकॉर्डिंगचा आवाज ऐकू आला. त्यांच्या सुटकेसाठी कर्नाटक येथील शंकेश्वर साखर कारखान्यावर पैसे घेऊन येण्याची मागणी करीत होते. जर पैसे आणून दिले नाहीत तर कापून टाकू अशी जीवे मारण्याची धमकी देत होते. या प्रकरणी 28 फेब्रुवारी रोजी केज पोलीसात 364(अ), 365, 506 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सहय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सपोनि.शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी तांत्रिक मदतीच्या आधारे संशयित आरोपी तुकाराम मुंडे (रा.चारदरी ता.धारूर), रमेश मुंडे (रा.कोठरबण ता.वडवणी), दत्तात्रय हिंदुराव देसाई (रा.कडगाव ता. भुदरगड जि.कोल्हापूर) या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशी दरम्यान दत्तात्रय याने सुधाकर चाळक यांचा खून करून त्याचे शीर धडावेगळे केले आहे. व पुरावा नष्ट करण्यासाठी धड पोत्यात बांधून कोल्हापूर जिल्ह्यातील हिरण्यकेशी नदीत फेकले व शीर तिथून पुढे 10 किमी अंतरावर नदीत फेकल्याचे सांगितले. सोमवारी या संशयितांना घेवून केज पोलीस कोल्हापूर जिल्ह्यातील नांगनूर परिसरात हिरण्यकेशी पुलावर पोहचले. त्यांनी गडहिंग्लजच्या पास रेस्क्यू टीमला घेऊन मृतदेहाचा शोध घेतला. सायंकाळी नदीपात्रात मृतदेह सापडला, मात्र मंगळवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाणबुड्यांच्या मदतीने ते शीर शोधत होते. परंतु अद्यापही शीराचा तपास लागलेला नाही. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सपोनि.शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोना.दिलीप गित्ते, अनिल मंदे यांनी केलेल्या अथक प्रयत्न, तपासामुळे नियोजनपूर्व अपहरण करुन पुरावा नष्ट केलेल्या खुनाच्या घटनेचा उलगडा झाला. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सुधाकर चाळक यांच्या खून प्रकरणी खुनाचा व पुरावा नष्ट करणे गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

Tagged