पदं पत्नीचं अन् रुबाब पतीचा, पदं आईचं अन् रूबाब लेकाचा अशा तर्हेनं महिला आरक्षणाचा गैरफायदा घेत पुढारपण करणार्या पुरूष मंडळींमुळे महिलांना स्थान मिळणे कठीण बनले आहे. शिवाय, राजकारणात महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय? हे सर्वश्रूत असतानाही याच क्षेत्रात काम करणं हेच एक दिव्य कार्य. राजकारणात प्रस्थापित घराण्यातील महिला सक्रीय असतात. परंतू शेती-मातीची ‘पूजा’ करणारी शेतकर्याची लेक, शेतकर्यांचा आवाज बनलेल्या महिला नेत्यांमध्ये गेवराईच्या पूजाताई अशोक मोरे यांचा आवर्जून उल्लेख होतो. कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना नेतृत्वगुण सिद्ध केले. लोकप्रियता, सक्रियता अशा सर्वच गुणांनी त्या प्रस्थापित नेत्यांच्या तुलनेत बरोबरीने आहेत, किंबहूना पुढे आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
मिरगाव (ता.गेवराई) हे त्यांचं मुळ गाव. बालपणापासून त्या औरंगाबादेत होत्या. अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. शारदा मंदिर कन्या प्रशालेत विद्यार्थी प्रतिनिधीचं पद मिळवून त्यांनी शालेय जीवनात नेतृत्वगुण सिद्ध केले होते. तिथेचं त्यांना चळवळीचा वारसा लाभला. राजकारणात तरूणाईने येणे गरजेचे असल्याचं ओळखून त्यांनी ‘ताई फाऊंडेशन’ची स्थापना करून महिला सुरक्षा, सक्षमीकरणावर काम सुरु ठेवलं. स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकात त्यांनी मैदानात उतरण्यासाठी वडिलांची परवानगी मिळविली. परंतू निवडणूक लढवणं हे डोंगराएवढं आव्हान होतं. बालपण, शिक्षण, किशोरवयीन कालावधीपर्यंत त्यांचा आणि शेती-मातीचा, गावाचा फारसा संबंध आलेला नव्हता. त्या गावी केवळ समारंभ, सणासुदीपुरत्या येतं. मात्र राजकारणातून सर्वसामान्यांचं, विशेषतः बळीराजाचं भलं व्हावे ही प्रबळ ईच्छाशक्ती त्यांना थांबू देत नव्हती. 2017 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अंतरवली (ता.गेवराई) पंचायत समिती गणातून त्यांनी नशीब आजमावलं. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात राजकीय तडजोडीतून त्यांना शिवसेनेची उमेदवारी स्वीकारावी लागली. मतदारांनी तरूण तडफदार चेहरा म्हणून संधी दिली. पंचायत समितीच्या सभापतीपदासाठीही त्यांचे नाव चर्चेत होते. परंतू प्रस्थापितांपुढे त्यांना डावललं गेलं. शिवाय, मराठा क्रांती मोर्चा, शेतकर्यांचे प्रश्न मांडताना मर्यादा येऊ लागल्या. याच काळात शेतकरी नेते, माजी खा.राजू शेट्टींनी मराठा क्रांती मोर्चादरम्यान राज्यभर गाजलेलं पुजाताईंचं भाषण ऐकलेलं. त्या भाषणावरूनच पुजाताईंना घरी जाऊन राजू शेट्टींनी पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं. शेतकर्यांसाठी काम करण्याची प्रबळ इच्छाशक्तीमुळे त्यांनी तत्काळ राजू शेट्टी यांचं नेतृत्व स्विकारलं अन् स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम सुरु केलं. तिथे अवघ्या 6 महिन्यात पूजाताई मोरे यांना आपल्या कामाचा जोरावर स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली. त्या संधीचं सोनं त्यांनी केलं. कर्जमाफी, पीकविमा, ऊस दर प्रश्न, महिला, युवती, युवकांच्या बेरोजगारीसारख्या प्रश्नांवर पूजाताईंनी सतत आवाज उठवला. शेतकर्यांचे प्रश्न मार्गी न लावणार्या तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला पहिला विरोध नोंदवत ‘सीएम गो बॅक’ नारा दिला. पुढे त्याची किंमत फडणवीसांना चुकवावी लागली. शेतकरी चळवळीत काम करताना युवती असूनही कुठलाही कमीपण न बाळगता सलग दोन-अडीच वर्षे एस.टी.बसमधून राज्यभर दौरे केले. संघटनात्मक बांधणीत मोठं योगदान दिलं. सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी बघता-बघता शेतकर्यांचा आवाज बनली अन् राज्यभरातील हजारो घरा-घरात अन् मना-मनात स्थान निर्माण करण्यात त्यांना यश आलं. राजकीय तडजोडी, प्रस्थापितांची हुजरेगिरी करण्याऐवजी जे मिळेल ते स्वकर्तृत्वाने मिळवू, अशा वृत्तीची खरी ‘स्वाभिमानी’ राजकारणी असलेली पूजाताई आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील आक्रमक चेहरा म्हणून राज्यभर ओळखली जाते. कसल्याही राजकीय भुलथापा नाहीत, बळीराजाचं राज्य यावं, हेच स्वप्न पाहणार्या पूजाताईंना विधिमंडळात बघण्याचं सर्वसामान्य कुटुंबातील हजारो शेतकरी, चाहत्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे, हीच त्यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन दिनी सदिच्छा.
प्रचंड लोकप्रियता
पूजाताई मोरे यांना राजकारणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, छत्रपती संभाजी महाराज व माजी खासदार राजू शेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्यात संघर्ष करण्याची मोठी क्षमता आहे. संघर्षाच्या जोरावर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तरूणाईसह समाजमाध्यमांवर त्यांची मोठी के्रझ आहे. समाजमाध्यमांवर त्यांना लाखोंच्या सख्येने फॉलो करणारा मोठा वर्ग आहे. विशेष म्हणजे प्रस्थापित युवा नेत्यांप्रमाणे फॉलोअर्स ‘स्पॉन्सर’ करण्याची गरज त्यांना भासत नाही.
कोरोना काळात सक्रीयपणे काम
प्रस्थापित नेते कोरोनाकाळात घरात बसलेले असताना स्वाभिमानीच्या पुजाताई मोरे यांनी शेतकर्यांच्या घरी जात त्यांना अर्सेनिक अल्बम सारख्या गोळ्या संपूर्ण गेवराई मतदारसंघात घरोघरी जाऊन वाटल्या. त्या कशा घ्यायच्या हे लोकांना समाजावून सांगितलं. हे काम वाटतं तितकं सोपं नव्हतं. पण राजकारणापेक्षाही समाजकारणाला अधिक प्राधान्य देणार्या पुजाताई त्यामुळेच इतर राजकारण्यांपेक्षा वेगळ्या भासतात. त्या लोकांच्या थेट चुलीपर्यंत जातात. कुठलाही थाटबाट न करता त्यांच्यातच एकरूप होतात. पुजाताई एखाद्या गावात गेल्यानंतर तेथील महिला, मुली अन् तरुणांना एक अप्रुप असतं. प्रस्थापितांच्या कुटील राजकारणाचा ती कसा मुकाबला करणार? अशी चिंता तिच्याबद्दल व्यक्त होताना दिसते.
अतिवृष्टीत शेतकर्यांच्या मदतीला
अतिवृष्टीत जेव्हा शेतकर्यांची पिकं पाण्यात गेली त्यावेळी पुजाताई यांनी शेतकर्यांच्या बांधावरून नजर न मारता गुडघ्या इतका चिखल, पाण्यात उतरून शेतकर्यांचं दुःख जाणून घेतलं. त्यात कुठलाही दिखावा नाही की वरवरचे सांत्वनपर दोन शब्द नाहीत. जे करायचं ते अगदी मनलाऊन. शेतकर्यांना न्याय कसा मिळेल हेच त्यांनी आजपर्यंत पाहीलं. अनेक स्वयंसेवी संस्थांकडून त्यांनी आपल्या भागातील गोरगरीब शेतकर्यांना मोफत बी-बियाणं वाटलं.
मुलगी म्हणून कुठलीही विशेष सवलत नाही
राजकारणासारख्या विचित्र क्षेत्रात ही मुलगी तग धरून आहे. पावलोपावली राजकीय संकटांचा सामना तिच्या पाचवीलाच पुजल्याचे दिसते. पण ती खंबीर आहे. मान-अपमान सहज पचवते. कुठल्याही ग्रामीण भागात जायचं झालं तर महामंडळ जिंदाबाद म्हणत प्रवास करते. लोकांनी घरात सहारा दिला तर तिथेच मुक्काम करते. कधी कधी गावच्या मंदिरातही मुक्कामाची वेळ आलीच तर तर जराही डगमगत नाही. मंदिरातीलच माईक घेते तिथूनच शेतकरी चळवळीच्या आंदोलनाची माहिती गावाला कळवते. कुणी आग्रह केलाच तर तिथेच भाजी-भाकरी खाते अन् दुसर्या दिवशी पुन्हा आपल्या चळवळीच्या कामाला लागते. औरंगाबादसारख्या मेट्रोसिटीत शिक्षण पूर्ण केलेल्या कुणालाही असं सहजपणे ग्रामीण भागात एकरूप होणं शक्य नाही. तिच्या इतके कष्ट तर अलिकडच्या काळातील प्रस्थापितांच्या घरातील कुणालाच शक्य नाहीत. एक मुलगी असुनही कुठलीही विशेष सवलत त्या मागत नाहीत. म्हणून त्यांच्या राजकारणाची विशेष दखल घ्यावीच लागते.
निमित्त
वाढदिवस विशेष
शुभम खाडे, बीड