चमत्कार! चोरी गेलेल्या दुचाकी पुन्हा तहसिल कार्यालयात अवतरल्या

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

चंद्रकांत अंबिलवादे दि.21 ः गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या दुचाकीवरुन वाळू तस्करी करणार्‍या काही दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 12 दुचाकी शुक्रवारी (दि.20) दिवसाढवळ्या तहसिल कार्यालयातून चोरी गेल्या होत्या. त्यानंतर काही तासातच या दुचाकी पुन्हा आहे त्याच ठिकाणी अवतरल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचा तर सहभाग नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पैठण शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून गोदावरी नदीतील वाळूचा लिलाव बंद आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या वाळूला सोन्याहून अधिक भाव आलेला आहे. त्यामुळे वाळू माफिया वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. टिप्पर, टॅ्रक्टरने वाळू चोरी करता येत नाही त्यामुळे वाळू माफियांनी शक्कल लढवत बैलगाडी, गाढव, दुचाकीवरुन अवैध वाळू उपसा सुरु केला. महसूल विभागातील पथकाने वाळू उपसा करणार्‍या दुचाकी जप्त करुन तहसिल परिसरात उभ्या केल्या होत्या. शुक्रवारी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मुख्य दालनासमोर लावलेल्या दुचाकीपैकी 12 दुचाकी चोरी गेल्या. विशेष म्हणजे तहसिलदार शेळके हे यावेळी कार्यालयात उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत दुचाकी चोरी झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी आरोपी निष्पन्न करत अंबादास रोकडे, अनिल रोकडे, राजू टेकडी, नारायण तवार, केशव सव्वाशे, दत्ता सव्वाशे, कपिल चव्हाण, शाहेद धांडे, नईम शाहबोदिन, अमीर शेख नवीन कावसन, सोहेल शेख, शाहरुख शेख, दिनेश सोनवणे, दिनेश नरवडे यांच्यावर कलम 379, 109 कलमाखाली गुन्हा दाखल केला. चोरी गेलेल्या दुचाकी पुन्हा तहसिल कार्यालयात अवतरल्यामुळे एकच चर्चा सुरु आहे. तसेच या प्रकरणामध्ये काही खाजगी व्यक्ती व तहसिल कार्यालयातील कर्मचार्‍यांविरुद्ध पुरावा गोळा करण्याचे काम पूर्ण केले आहे. त्यांच्यावरही गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
—————

Tagged