24 तास ड्युटी केलेल्या स्टेशन मास्तराचा हृदयविकाराने मृत्यू!

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे


घाटनांदूर रेल्वे स्थानकातील घटना

अंबाजोगाई दि.28 : तालुक्यातील घाटनांदुर रेल्वे मास्तरने सलग 24 तास ड्युटी केली. मध्यरात्री ड्युटीवर असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका झाला आणि बसल्या ठिकाणी आसनावरच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे सिग्नल न मिळाल्याने काही तास परळी आणि पानगावच्या रेल्वे स्थानकातच अडकून पडल्या होत्या. ही घटना सोमवारी (दि.28) पहाटेच्या सुमारास घडली.

मुसाफिर सिंह (वय 44, रा. बिहार) असे त्या स्टेशन मास्तरचे नाव आहे. परळी ते हैद्राबाद या रेल्वे मार्गावरील घाटनांदूर रेल्वे स्थानकात ते स्टेशन मास्तर म्हणून कर्तव्यावर होते. रविवारी (दि.27) सकाळी ते 12 तासांच्या ड्युटीसाठी स्थानकात रुजू झाले. रात्रपाळीच्या ड्युटीवर असणारे स्टेशन मास्तर प्रशिक्षणासाठी गेल्यामुळे मुसाफिर यांना त्यापुढील सलग ड्युटी करण्यासाठी स्थानकातच थांबावे लागले. सोमवारी पहाटेच्या वेळेस मुसाफिर सिंह यांचे बसल्या जागी खुर्चीवर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दरम्यान पानगाव (रेणापुर) येथे कार्यरत असलेले रेल्वे स्टेशन मास्तर नितीन संभारे यांनी पनवेल परळी रेल्वेला लाईन मिळण्यासाठी मुसाफिर सिंह यांच्याशी पावने चारच्या सुमारास दुरध्वनीवरून संपर्क साध्नायचा प्रयत्न केला. परंतु, ते दुरध्वनी उचलत नसल्याने त्यांनी अंबाजोगाई ते अहमदपुर मार्गावर असलेले रेल्वे गेटमन विजय मिना यांना स्टेशन मास्तर फोन का उचलत नाहीत हे पाहण्यासाठी घाटनांदूर स्थानकात पाठविले. मिना यांनी तत्काळ स्थानकात जावून पाहिले असता मुसाफिर सिंह हे खुर्चीवरच मृत्यू अवस्थेत पडलेले दिसून आले. त्यांनी तात्काळ सांबरे यांना घटनेची माहिती दिली. सांबरे यांनी वरिष्ठांना माहिती दिली. दरम्यान लाईन मिळत नसल्याने पनवेल ते परळी ही रेल्वे पानगाव रेल्वे स्थानकात तर काकीनाडा-शिर्डी एक्सप्रेस परळी रेल्वे स्थानकात दिड तासापासून थांबविण्यात आली होती. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार सांबरे यांनी घाटनांदुर रेल्वे स्थानकात येवून दोन्ही गाड्यांना सिग्नल दिला आणि त्यांना मार्गाक्रमित केले. दरम्यान, काकीनाडा एक्सप्रेस व पनवेल एक्सप्रेस गाड्यातील प्रवाशी रेल्वे थांबल्याने मोठ्या चिंतेत सापडले होते. रेल्वे सुरळीत झाल्यानंतर प्रवाशांनाही धीर आला.

Tagged