महाराजांसह डॉक्टरला लाखोंच्या खंडणीची मागणी!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नेकनूर
दि.27 ः एकाच खंडणीखोराने नेकनूर परिसरातील बेलेश्वर संस्थानच्या महाराजांना व लिंबागणेश येथील डॉक्टरांकडे खंडणीची मागणी केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.27) उघडकीस आला. यावेळी खंडणीखोराने पैसे न दिल्यास दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात बेलेश्वर संस्थान आहे. या संस्थानावरील भारती महाराज व लिंबागणेश येथील डॉ.सचिन जायभाये या दोघांना एकाच नंबरवरून अज्ञात व्यक्तीचा फोन आला. पहिलांदा भारती महाराज यांना फोन करून चार लाख रुपये द्या, अन्यथा आम्हाला तुमच्या खुनाची सुपारी मिळाली असल्याचे खंडणीखोर म्हणाला. त्यानंतर थोड्याच वेळात डॉ.सचिन जायभाये यांना त्याच व्यक्तीने फोन करून 45 लाखांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास तुमच्या हत्येची सुपारी मला मिळाली असल्याचे त्याने म्हटले. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात रविवारी (दि.27) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नेकनूर पोलीस ठाण्याचे सपोनि.मुस्तफा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

खंडणी मागणारा मद्यपी असण्याची शक्यता
महाराज व डॉक्टर यांना खंडणीची मागणी करणारा हा मद्यपी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण हा खंडणीखोर स्वतःचे पुर्ण नाव, पत्ता सांगत आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Tagged