सेवानिवृत्तीनंतरही राज्य शासनाकडून टाकसाळेंना काम करण्याची संधी
प्रतिनिधी । बीड
दि.21 : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य हमी सोसायटी (पुर्वीची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना) च्या सीईओपदी पुन्हा एकदा शिवानंद टाकसाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वी टाकसाळे हे या पदावरून सेवानिवृत्त झालेले होते. परंतु त्यांच्या कामाचा अनुभव, काम करण्याची क्षमता पाहता राज्य शासनाने त्यांना पुन्हा कंत्राटी म्हणून सेवा करण्याची संधी दिली आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने 17 मे रोजी अध्यादेश देखील काढला आहे.
राज्य शासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना, व केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजना या एकत्रित योजनेचे संनियंत्रण व प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी हे पद प्रशासकीय दृष्ट्या अंत्यत महत्वाचे आहे. शिवानंद टाकसाळे हे फेब्रुवारी 2023 मध्ये या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा फायदा होणार असल्याने त्यांना या पदावर सेवानिवृत्त झाल्यानंतरही कंत्राटी म्हणून नियुक्ती देण्यात येत आहे. यापुर्वी असलेले सर्व अधिकार आणि लाभ देखील त्यांना बहाल केले गेले आहेत.
शिवानंद टाकसाळे हे 1995 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासन सेवेत रूजू झालेले आहेत. यापुर्वी त्यांनी वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, जालना, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, परभणी आणि बीड जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ म्हणून काम केलेले आहे. बीडमध्ये ते अप्पर जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत होते. या काळात त्यांनी बिंदूसरा प्रकल्पातील गाळ काढण्याचे महत्वाचे काम केले होते. त्यांच्या संकल्पनेतूनच महाराष्ट्रात तलावातील गाळ काढण्याची मोहिम सुरू झालेली होती. बोगस डॉक्टर, स्त्री भ्रूण हत्या, अंमली पदार्थांची शेती आदींवर त्यांच्याच कार्यकाळात कारवाई झालेली आहे. बीड जिल्हा बँकेवर प्रशासक म्हणून काम करताना त्यांनी अनेक बड्या नेत्यांवर गुन्हे नोंद करून राज्यात खळबळ उडवून दिली होती. अनेक एनजीओ उभारणीत त्यांचा महत्वाचा सहभाग आहे. राज्यभरात विविध सामाजिक कार्यात देखील त्यांचा हिररीने सहभाग असतो. त्यांच्या कार्याचा शासन आणि सामाजिक संस्थानी विविध पुरस्कार देऊन गौरव देखील केलेला आहे.