उपअधीक्षक सुनील जायभाय यांच्या पथकाची अंबाजोगाईत कारवाई; 15 जनावरांची सुटका
अंबाजोगाई : कत्तलखान्याकडे जाणारा टेम्पो गाय, बैलासह पकडण्यात आला असून 15 जनावरांची सुटका केली. तर कत्तलखान्यावरील छाप्यात दोन गोवंशीय जनावरांचे मांस जप्त करण्यात आल्याची कारवाई पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाय यांच्या पथकाने स्वा.रा.ती. रुग्णालय परिसरात गुरुवारी सायंकाळी 9 वाजण्याच्या सुमारास केली.
पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, साळेगाव (ता.केज) येथील बाजारातून 15 गाय व बैल टेम्पोने (क्र.एम.एच.14 ए.एच.6149) शहरातील बाराभाई गल्ली येथील कत्तलखान्याकडे नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी स्वा.रा.ती. रूग्णालय परिसरातून सापळा लावून टेम्पो पकडला. यावेळी चालक मोमीन फेरोज (वय 30 रा.अंबाजोगाई) यास ताब्यात घेतले असता त्याने गाई, बैल कत्तलखान्याकडे नेत असल्याचे कबुली दिली. त्यास अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर बाराभाई गल्लीतील कत्तलखान्यात जाऊन पोलिसांच्या पथकाने झाडाझडती घेतली असता दोन गोवंशीय जनावरांचे मांस आढळून आले. नगरपरिषदेच्या कर्मचार्यांना पाचारण करून सदरील मांस जप्त करण्यात आले. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या चालकासह इतरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे अंबाजोगाई शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितले. ही कारवाई उपअधीक्षक सुनील जायभाय यांच्यासह पो.कॉ.सतीष कांगणे, पो.कॉ.नितीन आतकरे, पो.हे.कॉ.बारगजे, पठाण आदी कर्मचार्यांनी केली.